अनुभवी ज्ञान
एकदा एक मोठ्ठं मालवाहक जहाज बंद पडलं. दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक अभियंत्यांना बोलावण्यात आलं. काहीतरी इंजिन मध्ये बिघाड झाला असावा एवढं तर नक्की होतं.
अभियंत्यांनी खूप प्रयत्न केले पण, काही केल्या प्रॉब्लेम सापडेना. अखेर त्यांनी हार मानली. मग, परदेशातील काही अभियंत्यांना बोलावण्यात आलं - सगळे एकसे बढकर एक शिकलेले. त्यांनी ही भरपूर प्रयत्न केले पण इंजिन काही चालू होईना. इकडे जहाज कंपनी रडकुंडीला आली. जवळपास एक महिना जहाज जागेवरच उभे होते. खूप नुकसान होत होते.
म्हातारा मेकॅनिक
शेवटी, ही गोष्ट तिथल्या एका स्थानिक म्हातार्या मेकॅनिक च्या कानावर गेली. त्याने जहाज कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मळक्या कपड्यात तो म्हातारा हातात केवळ एक दुरुस्तीच्या सामानाचा छोटा बॉक्स घेऊन तिथे पोहोचला.
"तू दुरुस्त करणार?", अधिकाऱ्याने त्याचा अवतार पाहून विचारले.
"हो, साहेब. माझं आयुष्य गेलं इंजिन दुरुस्त करण्यात."
"पण, ही लहानसहान मोटार नाही. परदेशी बनावटीचं महागडं जहाज आहे. खूप उच्च शिक्षित अभियंत्यांना पण जमलं नाही. तू तर अंगठा बहाद्दर दिसतोस. तूला जमणार नाही. राहू दे."
"एकदा जाऊन तर बघतो. नाही जमलं तर मुकाटपणे निघून जाईन. तुम्ही एक रुपया पण देऊ नका. पण, दुरुस्त झाले तर मात्र मी मोबदला घेणार. "
अखेर त्याला परवानगी मिळाली.म्हातारा जहाजावर गेला. इंजिन रूम मध्ये जाऊन फिरून आला. एक तासभर निव्वळ इकडे तिकडे बघत होता. केवळ इंजिन ला कान लाऊन काहीतरी ऐकायचा प्रयत्न करत होता. ह्याच्याकडून काही होणार नाही अशी सगळ्यांची खात्री पटली.
तेव्हढ्यात म्हातारा एका ठिकाणी थांबला. हातातला बॉक्स उघडला. त्यातून एक छोटा हातोडा बाहेर काढला. त्या हातोडीने त्याने इंजिन वर एका ठिकाणी छोटा ठोका दिला. मागे वळला आणि इंजिन सुरू करायला सांगितले.. आणि काय आश्चर्य.. इंजिन सुरू झाले! सर्वांनी जोरजोरात ओरडत आनंद व्यक्त केला.
म्हातारा हसत जहाजातून खाली उतरून अधिकाऱ्याला भेटला.
"म्हातारबाबा, कमाल केलीस तू."
"साहेब, माझं कामच होते ते."
"बर, तुझे बिल किती झाले सांग."
"दहा लाख."
"काय?"
"दहा लाख?"
"हो."
"फक्त एक हातोडी मारण्याचे?"
"हातोडीचे एवढे होत नाहीत हो साहेब."
"मग?"
"हातोडी मारण्याचे दहा रुपये आणि हातोडी कुठे मारायची हे शोधायचे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद! "
अधिकारी म्हातार्या कडे पाहतच राहिला.. खरंच की, एवढ्या शिक्षित अभियंत्यांना जमले नाही ते ह्याने केवळ अनुभवाच्या जोरावर करून दाखवले होते. तो कामाची नाही, तर त्याच्या ह्या अनुभवाची किम्मत मागत होता!