अधिक महिन्यात का करतात ३३ बत्ताशांचे दान; वाचा काय आहे माहात्म्य

अधिक महिन्यात का करतात ३३ बत्ताशांचे दान; वाचा काय आहे माहात्म्य

 ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सध्या कोरोनामुळे जगणेच कठीण झाले असल्याने कशाला हवा तेरावा महिना असेही अनेक जण म्हणतील. परंतु, जरा थांबा... मराठी महिन्यांमध्ये दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. या महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. मराठी महिन्यांमध्ये तिथीला अधिक महत्व असते. बरेचदा एकाच दिवशी दोन तिथी येतात. त्यामुळे तिथी कमी कमी होत जातात. त्याचीच भरपाई करण्यासाठी या महिन्याची योजना केली आहे.

अधिक महिन्याचा महिमा सांगताना नागपुरातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रशांत वांढरे महाराज सांगतात, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याबद्दल अनेकांना माहिती नसते. परंतु, धर्मशास्त्रात या महिन्याला विशेष स्थान आहे. दर तीन वर्षांनी वेगवेगळे महिने अधिक होतात.जो महिना अधिक असतो तो अधिक आणि नीज अशारीतीने येतो. यंदा अश्विन महिना अधिक आला आहे. त्यामुळे अधिक अश्विन आणि नीज अश्विन असे दोन महिने आले आहेत. प्रत्येक राशीसाठी काही ना काही फलप्रद हा महिना घेऊन येत असतो. यंदाचा योग अतिशय दुर्मिळ आणि चांगला आहे.

आपली संस्कृती त्यागाला आणि दानाला महत्व देते. या महिन्यात दान केल्याने विषेश पुण्य मिळते. हे दानही सत्पात्री व्यक्तीला करणे गरजेचे आहे. जीवनात पैशाला जेवढे महत्व आहे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक महत्व दानाला आहे. जावई आणि भाचा (बहिणीचा मुलगा) प्रत्येकासाठी विशेष आदरार्थी असतातत्यमुळे त्यांना दान करण्याची प्रथा या महिन्यात आहे. अधिक महिन्यात उपवास, स्नान, पारायण आदींना खूप महत्व दिले आहे. परंतु, कोरोनाचा फटका अधिक महिन्यालाही बसणार आहे. या महिन्यात केलेली पूजा विशेष पावन असते. परंतु, कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळूनच सारे विधी करावे लागणार आहेत. दर तीन वर्षांनी हे भाग्य लाभत असल्याने सत्पात्री दान अवश्य करा, असेही महाराज सांगतात.

का करतात ३३ बत्ताशांचे दान

मराठी महिन्यातील तिथी दरवर्षी कमी कमी होत असतात. प्रत्येक वर्षी दहा ते अकरा तिथी कमी होत असल्याने तीन वर्षांमध्ये महिन्याचा फरक पडतो. तीन वर्षांत जवळपास ३२ ते ३३ दिवसांचा फरक पडतो. त्याच फरकाची भरपाई करण्यासाठी तीस किंवा एकतीस दिवसांच्या अधिक महिन्याची योजना करण्यात आली आहे. म्हणून या महिन्यात ३२ किंवा ३३ बत्ताशांचे दान केले जाते. या दानाला विशेष महत्व असल्याचे दाखले पुराणात आहेत.

अश्विन महिना विशेष फलदायी
यंदा अश्विन महिना अधिक आला आहे. अश्विन म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाचा काळ... त्यामुळे या महिन्यात आलेल्या अधिक महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात महिनाभर उपवासही केले जातात. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती, निदान एक दिवस गंगास्नान केल्यास पापनिवृती होते. शक्य असेल त्याने व्दादशी, चतुर्थी, अष्टमी, नवमी, पौर्णिमा या दिवशी दान करावे.

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने