डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नाशिक भेट....१६.११.१९५६
आणि डॉ. आंबेडकर नगरची उभारणी..
भारत तेजाळे M.no.9422728416
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकाच वेळेस सामाजिक, राजकीय व धम्म चळवळ उभारताना आपल्या समाजाची एक गृहनिर्माण सोसायटी असावी याकरिता पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे एक वसाहत निर्माण करण्या करिता नियोजन करीत होते.(फोटो सौजन्य : शेजवळ कुटुंबीय डॉ. आंबेडकर नगर)
या वसाहतीच्या निर्मितीच्या संकल्पने पासून पूर्णत्वापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिगत लक्ष होते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांमधून त्याचा प्रत्येय येतो.
तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर यांच्या ऑर्डर नंबर LAQ-490 नाशिक २६.७.१९४३ नुसार १० एकर २० गुंठे जमीन महार कॉलनी करिता रुपये ४००० च्या बदल्यात दादासाहेब गायकवाड यांना देण्यात आली.
केंद्र सरकारने केलेल्या मागणी नुसार व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून या जमिनीतील ४.१३ एकर जमीन गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रेस, गांधीनगर ह्या केंद्र शासनाच्या उपक्रमास देण्यात आली.उर्वरित जागेवर समाजातील गोरगरीब कुटुंबांकरता गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्याचे ठरले.
परंतु सहभागी सभासदांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बांधकामा करिता १९५२ रोजी समाज कल्याण खात्या कडून रुपये ७२००० चे कर्ज घेण्यात आले. सदर कर्जातून संपूर्ण वसाहतीच्या बंगल्यांच्या निर्मिती करिता बांधकाम साहित्य खरेदी करून सभासदांना उपलब्ध करून देण्यात आले.
चीफ प्रमोटर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ८ जुलै १९५४ रोजी उपनिबंधक सहकार नाशिक यांच्याकडे डॉ. आंबेडकर नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ( B-1073) नावाने नोंदणी करण्यात आली.अनेक अडचणींवर मात करत ६५ बंगल्यांची ही टुमदार वसाहत व भव्य सभागृह नावारूपाला आले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील धम्मदीक्षेच्या सोहळ्यानंतर तब्येत अतिशय खालावलेली असताना देखील दिनांक १६ नोव्हेंबर १९५६ रोजी या वसाहतिला माईसाहेब आंबेडकर यांच्यासह भेट दिली. त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली मागासवर्गीयांची टुमदार वसाहत व तेथील लोकांकरीता एक भव्य सभागृह बघून बाबासाहेब भारावून गेले. तेथे उपस्थित कर्मवीर दादासाहेब गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की या वसाहतीतील सभागृहास आपण नाव सुचवावे. थोडा वेळ विचार करून अत्यंत धीर गंभीर होऊन बाबासाहेबांनी सूचना केली की माझ्या रमाचे नाव या सभागृहास देण्यात यावे. उपस्थित सर्वांचे डोळे पानावले व मुकदर्शक संमतीने सर्वांनी आपल्या माना हलवल्या . बाबासाहेबांच्या सूचनेप्रमाणे हॉलला मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह असे नाव देण्यात आले.यानंतर अवघ्या वीस दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण झाले.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर नाशिक जिल्ह्यातील पहिला धम्मदीक्षेचा कार्यक्रम याच सभागृहासमोरील पटांगणात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.या धम्मदिक्षेच्या कार्यक्रमासाठी ब्रह्मदेशाचे सरन्यायाधीश ऊ टून हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६.११.१९५६ रोजी नाशिक येथील डॉ. आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटीस दिलेल्या भेटीला आज 68 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही समस्त आंबेडकर नगर रहिवासी या ऐतिहासिक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वास त्रिवार वंदन करतो.