विनावाहक विनाथांबा अशी इचलकरंजी-कोल्हापूर बस होती. सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. सणामुळे बसला बर्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. गाडीने हेर्ले ओलांडल्यानंतर त्या आजी मला म्हणाल्या, "व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?"
[मास्तर मंजे कंडक्टर].
मी म्हटलं "आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं."
"आरं देवा... मंग तिकीट??"
"त्ये खालीच,एस.टी त बसायच्या आधीच काढायचं असतंय."
"मग आता???" आजी काळजीने म्हणाली.
"तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल.तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.""दुसरी इयत्ता पास हाय म्या.म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले.गडबडीत बाकी न्हाय वाचलं.""अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये कुणाचं काय ऐकत नाहीत. तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू..."दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.
डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली, "नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार."ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता.
आजीला म्हटलं, "आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा."आजी कैच बोलली नै. बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं... "आज्जी अजून इथंच?" आज्जीनं आपली बटव्याची पिशवी काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं. आज्जीनं उतरल्यावर इचलकरंजी-कोल्हापूर असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली
"टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढन.".... म्हणाली
"ज्या कामाला आले, ते काम झालं,सायबान वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर.पण त्या अंबाबाईनं चार चौघात लाज राखली माझी.दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर....आता जाताना मात्र इसरायची न्हाई तिकीट काढायला.महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून... हे बरं न्हाई बाबा..."मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं.