डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहातं घर विकाव लागल....
नामदेवराव व्हटकर |
माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी... कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला... तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू... एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे... जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं... एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे... यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला... तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं... वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला... त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला 'दलित मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित केलं...
६ डिसेंबर १९५६... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस...६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते...त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं...चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही...
छापखाना गहाण ठेवावा लागला
अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता... काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले....
बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आले...
घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले
या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण २ हजार ८०० फूट रील संपली होती... दुसऱ्या दिवशी बाँबे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली... आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रशप्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता... त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले... पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत... त्यामुळे त्या कायमच्या गेल्या...मुंबई सोडावी लागली...
मालमत्ता गेली तर गेली... पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या, त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगासाठी कैद करता आलं, याच समाधान त्यांना होतं... आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणांची नामदेवराव यांनी केलेलं हे जगातील एकमेव चित्रफीत आहे... या गोष्टींचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याच भांडवल केलं नाही...
यातील चित्रीकरण आणि त्यावेळच्या आठवणी हा संदर्भ त्यांच्या "कथा माझ्या जन्माची" या आत्मचरित्रातून घेतला आहे... नामदेवराव व्हटकर समजून घ्यायचे असतील तर हे आत्मचरित्र नक्की वाचा...
============================