मुख्यपृष्ठइतिहास बहुरूपी हेर ‘बहिर्जी नाईक’ byVikram dhanawade •डिसेंबर २७, २०२२ 0 बहुरूपी हेर ‘बहिर्जी नाईक’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक होत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणून गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे नाव घेतले जाते. स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते.गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रूप्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसते.शत्रू गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्त्वाची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने आणि युद्ध प्रसंगी रामबाण इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम गुप्तहेर खाते करत अस म्हणजे एक प्रकारे विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे.महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक.छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक जाधव यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत..गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक .शत्रूच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीनिशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा.त्यामुळे बहिर्जीनी दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखी युद्ध तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्याच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रूला धूळ चारत बाहेर पडायचे. बहिर्जी हे वेषांतर करण्यात पटाईत होते.एखाद्या व्यक्तीने त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनिटांत दुसऱ्या वेशात पाहिले तर त्याला ते किंचितही ओळखू येत नसत, इतका जबरदस्त वेश ते पालटायचे.महत्त्वपूर्ण माहिती द्यायची असल्यास बहिर्जी स्वत:हून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत. शत्रूच्या गोटात जाऊन त्याची माहिती काढण्यात निष्णात असलेल्या बहिर्जी नाईक चक्क दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत.यांनी काढलेल्या माहितीच्या आधारावर अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांना यश मिळाले होते. दिल्लीच्या बादशहाच्या महालात जाऊन देखील ते पक्की माहिती काढून आणत होते.महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्राणपणाने ते खाते चालवत असतं. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता..खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यास कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीद बहिर्जीनी दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेर खाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक.बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होतीशाहिस्तेखानाची फजिती करण्यामध्ये देखील महत्त्वपूर्व वाटा बहिर्जीचा होता. त्यांनी खानाची प्रत्येक हालचाल महाराजांपर्यत पोचवली आणि लाल महालात शिरकाव करण्याचा मार्ग कळवला.महाराजांना चकवू पाहणाऱ्या कारतलब खानाचा डाव देखील बहिर्जीनी उधळून लावला.अफझल खान महाराष्ट्राच्या भूमीत आल्यापासून बहिर्जी त्याच्यावर नजर ठेवून होते. वेळ पडली तर त्याच्या गोटात घुसून मिळेल ती महत्त्वाची माहिती काढून ते राजांपर्यंत पोचवत होते.अफझल खान हा शिवाजी राजांना संपवण्यास आला आहे हा निरोप पोचवणारे देखील बहिर्जीच!या निरोपानंतर महाराजांनी खेळी बदलली आणि खानाचा शेवट कसा केला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या बुद्धिमत्तेची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.शिवकाळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. जगातील सर्वच गुप्तहेर संघटनेकरिता काम करणाऱ्या गुप्तहेरांची खरी ओळख लपवली जाते. देशासाठी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या गुप्तहेरांच्या घरच्यांनाही ते गुप्तहेर आहेत हे शेवटपर्यंत समजत नाहीत.स्वराजाच्या वाढीसाठी आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी बहिर्जी नाईक यांची ओळख ही गुप्त ठेवणेच महत्त्वाचे होते, आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा अष्टप्रधान मंडळामध्ये समावेश केला नसेल.महाराजांच्या हृदयात त्यांच्या बद्दल मोठा आदर/सन्मान होता. महाराजांना भेटण्यासाठी बहिर्जी नाईक यांना वेळ, काळचे बंधन नव्हते. यावरूनच त्यांची थोरवी लक्षात यावी.महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये बाणूरगड नावाचा एक किल्ला आहे. तेथे या महान गुप्तहेराची समाधी आहे. Tags: इतिहास Facebook Twitter