महाभारतातील बकासुर राक्षसाची गुहा कोकणातील या गावात आहे

महाभारतातील बकासुर राक्षसाची गुहा कोकणातील या गावात आहे 


माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

महाभारतात बकासुर राक्षसाची एक कथा आहे.त्या कथेनुसार बकासुर राक्षसाला दररोज गाडीभर अन्न व एक माणूस खाण्यासाठी लागत असे.ती कथा अशी आहे.
बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे.हि कथा घडलेले गाव म्हणुन वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गाव प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ ऐनारी नावाचे गाव आहे.या गावापासून जवळच ५ कि.मी. अंतरावर डोंगरावर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश..
येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.भीम व बकासुर या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. राकसवाडय़ातूनच पुढे ऐनारीच्या जंगलात शिरावे लागते. अर्जुन कडय़ाला वळसा घालून डुब्याच्या कडय़ावरून सुमारे दीड कि.मी. पूर्वेकडे चालावे. डुब्याचा कडा गाठण्यासाठी दोन कि.मी.ची अवघड वाट पार करण्यासाठी तेवढीच मनाची जिद्द असावी लागते. मग प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेली ऐनारीची विशाल गुहा दृष्टीस पडते. या गुहेची कथा विलक्षण आहे. ही पांडवकालीन असावी असा सगळय़ांचाच समज आहे. तशा अनेक लोककथा आहेत. ऐनारीला कुशीत घेतलेला सह्याद्रीत अनेक गुहा आहेत. या  परिसरात सुमारे ९ गुहा आहेत. यातील सात गुहा या कोरलेल्या आहेत. गुहेच्या शेजारी २० फुटांवर वैशिष्टय़पूर्ण अशी विहीर आहे. या परिसरात भीमाची पावले आहेत. अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या ऐनारीतल्या गुहा सध्या ग्लोबल वॉर्मिगच्या पडछायेखाली आल्या आहेत.ही गुहा सह्याद्रीत झाकून गेली होती. ऐनारीच्या ग्रामस्थांनी एकत्र होत श्रमदानाने गुहेच्या प्रवेशद्वारावरची माती मोठय़ा कष्टाने बाजूला करत गुंफेचे तोंड खुले केले.पण झपाटय़ांने या गुहांचे खच्चीकरण होत असून त्या कोसळू लागल्या आहेत.या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे.
गुहेचे अंतर्गृह वैशिष्टय़पूर्ण आहे. आत शयनगृह आहेत. पाण्याची कुंडे आहेत. १२ खांबांचे सभागृह आहे. शेजारी ६ शयनगृह बरोबर समोर गर्भगृह, त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी जागा. प्रत्येक  खांब १२ ते १४ फूट उंचीचा. प्रत्येक खांबामध्ये १० फुटांचे अंतर आणि खांबाचा व्यास दोन फूट अशी रचना आज दृष्टीस पडते. ही गुहा गेली काही वर्षे बुजली गेली. आता खांबाची उंची १२ फूट मिळते; परंतु अंतर्गृहात हीच उंची १४ फूट मिळते. शयनगृहात दगडी पलंग आहेत. शेजारी पाण्याची कुंडे आहेत. अंतर्गृहात प्रकाशाची व्यवस्था कुठे दिसत नाही. परंतु गुहेपासून २० फुटांवर पाण्याची विहीर आहे. कडय़ाला उभा छेद मारून खोदण्यात आलेल्या विहिरींच्या काटकोनात थेट भुयार काढण्यात आले आहे. या भुयारांचे एक टोक गुहेत संपते. याच मार्गाने वातानुकूलित व्यवस्थापन करण्यात आले होते हे स्पष्ट होते. अर्धा डोंगर डोक्यावर घेऊन हजारो वर्षापूर्वी खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे. गुहेपासून हाकेच्या अंतरावर मोठी शिळा आहे. पांडवांनी गुहेचे काम सुरू असताना पहाट होण्यापूर्वी आपल्याला सांगावा धाडावा असे एकाला सांगून त्याची रवानगी टेकडीवर केली होती. मात्र पहाट झाली तरी तो तेथेच झोपून राहिला म्हणून क्रोधीत होऊन भीमाने त्या टेहेळणीसाठी ठेवलेल्या माणसाची मान धडावेगळी केली. त्याचीच ती शिळा अशी आख्यायिका आहे.

या गुहेपासून २ कि.मी.वर वेसरप गावाची हद्द सुरू होते. येथे एका डोहाला भीमाचे नाव देण्यात आलेले आहे. शेजारच्या अर्जुन कडय़ावर अशीच गुंफा दिसते. सध्या या गुंफांमधून प्राणी आणि वटवाघळांचा मुक्त संचार आहे. गगनगड या भागापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. या गुहेच्या उत्तरेकडे ही गुंफा आहे. या परिसरात अनेक छोटय़ा-मोठय़ा गुहा आहेत. एक प्राचीन खजिना या परिसरात जपला गेला आहे.
या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा गुरव,मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हा?भात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी?ही परंपरा पूर्ण केली जाते. काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष.


बकासुर राक्षसाची गुहा कोकणातील या गावात आहे

 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने