कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात होणार मृत्यू? काय आहे या VIRAL दाव्यामागचं सत्य
==========================
*_〽️माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव〽️_*
*दि. २८ जुलै २०२१*
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा (Second Wave of Coronavirus) सुरू आहे. दरम्यान कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाची (COVID-19 Vaccination Drive) प्रक्रियाही तेजीने करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कोरोना काळात लसीकरणाबाबत सोशल मीडियावर (Social Media) अनेक अफवा (Fake News) पसरवल्या जात आहेत. दरम्यान WhatsApp आणि सोशल मीडियावर सध्या असा एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात असं म्हटलं आहे की व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या जीवाला धोका आहे.
या पोस्टमध्ये एका नोबेल विजेत्याच्या हवाल्याने असं म्हटलं जात आहे की कोरोना लस घेणाऱ्यांचा दोन वर्षांच्या आतमध्ये मृत्यू होईल. सरकारी संस्था असणाऱ्या पीआयबीने या दाव्याबाबत पडताळणी केली, त्यानंतर पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं आणि लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर नोबेल विजेत आणि फ्रेंच व्हायरॉलॉजिस्ट ल्यूक माँटेनिअर यांच्या हवाल्याने ही बातमी शेअर करण्यात आली आहे. व्हायरल मेसेजमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, 'लस घेणारे सर्व लोकं दोन वर्षाच्या आतमध्ये मरतील. नोबेल विजेता ल्यूक माँटेनिअर यांनी अशी पुष्टी केली आहे की ज्या लोकांना व्हॅक्सिन देण्यात आलं आहे ते वाचतील अशी शक्यता कमी आहे. धक्कादायक आहे की जगातील अव्वल व्हायरलॉजिस्टने स्पष्टपणे सांगितले आहे- अशा लोकांसाठी कोणतीही आशा नाही आणि ज्यांना यापूर्वी लसी दिली गेली आहे, त्यांच्यावर उपचार संभव नाही. आपल्याला आता मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले पाहिजे.
व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं आहे मृत्यूचं कारण
या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, 'लसीच्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर, इतर आघाडीच्या विषाणूशास्त्रज्ञांनी वैज्ञानिकाच्या दाव्याचे समर्थन केले. ते सर्वजण अँटीबॉडी-आधारित वाढीमुळे मरण पावतील.'
पीआयबी फॅक्ट चेकने पडताळला दावा
पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोबेल विजेत्याच्या हवाल्याने दावा केला जात आहे. कोरोना लसीकरणानंतर दोन वर्षानंतर मृत्यू होईल हा दावा खोटा आहे. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हा फोटो तुम्ही देखील फॉरवर्ड करू नका.
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
==========================
*माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव*
==========================