एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!
गाव’ या विषयाशी आपण अगदी नकळत जोडले जातो. तसं कधी घडलं, हे आपलं आपणालाच कळत नाही. पण गम्मत अशी आहे, की ज्यांना गाव आहे ते तर त्यात रमतातच, पण ज्यांना गाव नाही तेही रमतात. कारण मुळात गाव हा विषयच असा आहे.
हा विषय आहे एखाद्याला नॉस्टॅल्जिक करणारा, एखाद्याला हळुवार स्पर्श करणारा, तर एखाद्याला अगदी नको असणारा सुद्धा! गाव शब्दांत काहीतरी आहे, काय ते नक्की सांगता येत नाही, पण गाव नसणारे सुद्धा जेव्हा फक्त गावाबद्दल बोलतात, तेव्हा कळतं, गाव हा विषय फक्त तुमचा आमचा नाही, तर तो सगळ्यांचा आहे. प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात एक गाव असतेच.
भरपूर वेळा आपण एक डायलॉग हिंदी सिनेमात ऐकला असेल , “एक म्यान मे दो तलवार नही रह सकती”, पण आपल्या भारतात एक गाव असंही आहे, की ज्याच्याबद्दल गमतीने म्हणता येईल, “दो म्यान मैं एक तलवार नहीं रह सकती”.
तुम्ही म्हणाल काय भंकस लावली आहे राव! पण हे जाणण्यासाठी तुम्हाला आता एका गावी यावं लागेल, तेसुद्धा इन्डो-म्यानमार बॉर्डरवर! जिथे गाव तर एक आहे, पण देश मात्र दोन! तुम्ही म्हणाल कसं शक्य आह, एक गाव आणि दोन देश?
हे मात्र खरंच आहे! कुठलीही मस्करी नाही! एक असं गाव आहे, जे दोन देशांमध्ये विभागले गेले आहे. पण हे जाणण्यासाठी तुम्हाला ईशान्य भारतात जावं लागेल.
नागालॅन्डमधील “मोन” जिल्ह्यामधे “लॉन्ग्वा” नावाचं गाव आहे, जिथे गाव एक, पण देश… थांबा! थांबा! अनेक नाही, पण दोन नक्की! कारण हेच ते गाव आहे ज्यामधील नागरिकांना दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे, भारत आणि म्यानमार!
लॉन्ग्वा गाव हे दोन्ही देशांच्या सीमेवर अशा काही ठिकाणी आहे, की त्यांना दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळाले आहे. यामुळे “आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन” या म्हणीचीही आठवण व्हावी. हे गाव मोन जिल्ह्यापासून ४२ किलोमीटर दूर आहे.
इंडो-म्यानमार सीमा या गावाला दोन क्षेत्रांत विभागते. एक भाग भारताचा आणि दुसरा भाग म्यानमारचा. या गावातल्या लोकांना सीमेवर फिरण्यासाठी व्हिसा वगैरेची गरज लागत नाही, ते मुक्तपणे हिंडू शकतात.
यापुढचा भाग अधिक गमतीचा आहे बरं का मंडळी… काही लोंकांचे “किचन” म्यानमारमध्ये आणि बेडरूम चक्क भारतात आहे. काय मजा आहे नाही.
निसर्गाने सुद्धा या गावावर सौंदर्याची उधळण केली आहे. तुम्ही या ठिकाणी डोयान्ग नदी, नागालँड सायन्स सेन्टर, होंगकॉग मार्केट आणि शिलोय लेक अशा उत्तम ठिकाणी मनमुराद भटकू शकता.
ह्याच गावाच्या वेशीवर “आसाम रायफल” कंपनी आहे आणि काही अंतरावरच एका टेकडीवर एक स्तंभ आहे. त्यावर ‘154 BP 1971-72’ असे सांकेतिक भाषेत लिहिले आहे. जे दोन्ही देशांच्या सीमांना अधोरेखित करते.
लॉन्ग्वा गावचे जे मूळ नागरिक आहेत त्यांना, “कोण्याक” असं म्हणतात. अशी एक आख्यायिका आहे, की हे लोक शत्रूच्या डोक्याच्या कवट्या गोळा करतात व त्या कवट्यांचं हार त्यांच्या गळ्यात घालतात.
जेणेकरून समोरच्याला कळावं, की त्यांनी युद्धामध्ये किती मुंडकी कापली आहेत. समोरच्या शत्रूला त्यांची भीती वाटावी. पण ह्यामागचं खरं कारण असं आहे, की असा पोषक परिधान करून, त्यांच्या शेतीवर डोळा ठेवणाऱ्यांची काही धडगत नाही असेच त्यांना सुचवायचे असेल, म्हणतात ना “SURVIVAL IS EVERYTHING”.
ईशान्य भारत हा कायम दुर्लक्षित राहिलेला प्रदेश आहे. तिथल्या लोकांनाही आपण भारतीय आहोत ही जाणीव आत्ता आत्ता कुठे होऊ लागलीय. विशेष आनंदाची बाब म्हणजे, इथले लोक सुद्धा “टुरिझम”साठी ईशान्य भारताची निवड करू लागलेत, हेही नसे थोडके!
“दोन डोळे शेजारी, भेट नाही जन्माची” अशी काहीशी आपली अवस्था व्हायची, अशी ईशान्य भारतातील परिस्थिती… पण ठीक आहे, ईशान्य भारतातील वाढता पर्यटन व्यवसाय बघता, “देर से आये लेकिन दुरुस्त आये” असंच म्हणावं लागेल.
तुम्हाला या ठिकाणी कधी जायचं असेल, तर लॉन्ग्वा गावी जाण्यासाठी तुम्हाला “नागालॅन्ड स्टेट ट्रान्सपोर्ट”च्या बसेस तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही ऑक्टोबर आणि मार्च महिन्यांमध्ये जाऊ शकलात, तर निसर्गाचं एक अनोखं रूप तुम्ही येथे पाहू शकता.
या दिवसांमध्ये नागा महोत्सवातल्या अनेक गोष्टींचा तुम्ही भरभरून आनंद लुटू शकता. इथली माणसं प्रेमळ आहेत. “अतिथि देवो भव” ही संस्कृती मानणारी, सर्वांचं मनापासून स्वागत करणारी, अशी ही मंडळी तुम्हालाही आवडतील.
किती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात, फक्त आपण जाण्याची खोटी…
चला मग कधी निघताय, लॉन्ग्वा गावाला जाण्यासाठी, “काय माहित आपलीही कोणी वाट बघत असेल तिथे”…
==========================