
सावरकर आणि आंबेडकर
स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर भेट कधी झालीच नाही असा एक अपसमज मराठी चरित्रकारांत, राजकारण्यांत, संशोधकांत, विचारवंतात अकारण पसरलेला आहे.
पण तसे नाही. १९३९ ते १९४४ पर्यंत हे दोघे महान पुरुष अनेक वेळा एकमेकांसमोर आले होते. त्यांच्यात चर्चा, विचारविनिमय होत होता. परस्परांविषयी त्यांना आस्था, सदिच्छा होती, कितीतरी गोष्टींत त्यांचे मतैक्य होते. इतकेच नव्हे तर डॉक्टरांनी त्यांचा Thought on Pakistan हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी त्याबद्दल चर्चासुद्धा केली होती. एका इतिहासावर नवा प्रकाश...
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही हिंदुस्थानच्या समाजकारण आणि राजकारणातली दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. दलितांच्या हिताचा विचार आणि आचार हे बाबासाहेबांचे जीवन उद्दिष्ट, तर हिंदूंना विज्ञाननिष्ठ बनवून त्यांचे जातीविरहित संघटन बनवून हिंदूंचा जन्मभर कणखरपणे आवाज उठविण्याचे कार्य सावरकरांनी केले.
मुंबईच्या दादर विभागात अनेक वर्षे निवास करूनही यांची भेट कधीच झाली नाही असा एक अपसमज गेली कित्येक वर्षे पसरलेला आहे. डॉ. य. दि. फडके. डॉ. धनंजय कीर तसेच अनेक आंबेडकरी विचारवंत त्याच समजुतीत होते.
सावरकर सदनाला नाही म्हटले तरी नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. लोहिया, मानवेंद्र रॉय, बाबू पुरुषोत्तमदास टंडन, माजी राज्यपाल श्रीप्रकाश, केंद्रीय मंत्री स. का. पाटील, बाबू जगजीवनराम यांसारखी राष्ट्रीय पातळीवरची मंडळी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, भालजी पेंढारकर, पृथ्वीराज कपूर, शांता आपटे यांच्यासारखी चित्रपटसृष्टीशी निगडित असलेली मंडळी भेट देऊन गेलेली होती. तिथे बाबासाहेबांसारखा खंदा विचारवंत, प्रज्ञाशाली नेता येऊन गेलाच नसेल ही गोष्ट खरी वाटण्यासारखी बिलकूल नाही.
दुसर्या बाजूने याच सावरकरांचा धाकटा भाऊ डॉ. नारायणराव सावरकर हा डॉक्टरसाहेबांच्या खास वर्तुळातला. डॉ. मुंजे, साहित्यसम्राट केळकर, शंकरराव दाते, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, आचार्य दोंदे, रामभाऊ तटणीस ही थोर मंडळीसुद्धा बाबासाहेब आणि सावरकर दोघांच्याही परिचयातली.
मग हा प्रकार काय होता? अपसमज! चुकीची धारणा.
या विषयाच्या खोलात गेल्यावर एक नाहीतर कमीत कमी नऊ-दहा प्रसंगाची साक्ष इतिहास देत आहे की, बाबासाहेब आणि सावरकर एकमेकांच्या समोर असत, बोलत असत, चर्चा करीत असत. हे दोघेही महापुरुष परस्परांविषयी आपुलकी, सदिच्छा बाळगून होते, आदर बाळगून होते, इतकेच नव्हे तर बर्याच विषयांत त्यांच्यात मतैक्य होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक भेटीगाठी संदर्भातली ही खालील निरीक्षणे -
१) २८ जानेवारी १९३९ रोजी दादरच्या हिंदू कॉलनीत ‘विविध वृत्त’चे संपादक रामभाऊ तटणीस यांच्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी बॅ. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. सावरकर आणि आंबेडकर दोघांनीही पाठिंब्याची भाषणे केली.
२) ५ मे १९३९ रोजी भारत मंत्र्याचे नियोजित सल्लागार, मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदू सभेने एक उपहार दिला. त्याप्रसंगी सावरकर, आंबेडकर दोघेही उपस्थित होते.
३) १३ जानेवारी १९४० रोजी सावरकर सदनात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आचार्य दोंदे आणि दलितांचे नेते डॉ. आंंबेडकर आले होते, तेव्हा चर्चा झाली.
४) १८ एप्रिल १९४०. कॉंग्रेसेतर पक्षांची सभा सर चुनीलाल मेहतांनी बोलावली होते. दोघेही उपस्थित होते.
५) १४ मार्च १९४० ताजमहाल हॉटेलमधल्या बैठकीस सर जगदीश प्रसाद, सर र. पु. परांजपे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, लोकनायक आणे, डॉ. मुंजे, सावरकर, आंबेडकर दोघेही उपस्थित होते.
६) २६ जुलै १९४१ पुण्याच्या गोखले हॉलमध्ये सर्वपक्षीय परिषद भरली होती. सर तेजबहादूर सप्रू, डॉ. राधाकृष्णन, र. पु. परांजपे, बॅ. जयकर, सर विश्वेश्वरैया, डॉ. आंबेडकर, बॅ. सावरकर दोघेही उपस्थित होते.
७) ११ एप्रिल १९४३ दिल्लीचे हिंदू महासभा भवन - व्हाइसरॉयच्या कौन्सिलचे सभासद डॉ. आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक तास बैठक झाली.
८) २८ फेब्रुवारी १९४१ रोजी मद्रासच्या ‘हिंदू’मध्ये सावरकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात त्यांनी डॉ. आंबेडकरांनी ‘पाकिस्तान’वर जे पुस्तक प्रसिद्ध केले होते त्याची प्रसिद्धी होण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती असे सांगितले. आंबेडकरांचे म्हणणे परिस्थितीचे सत्यकथन आहे, पाकिस्तानचा पाठपुरावा नाही असे उद्गारही सावरकरांनी काढले होते.
९) ५ फेब्रुवारी १९४० रोजी पारशी समाजाची एक बैठक मलबार हिलवर बोलाविली गेली होती. या बैठकीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही उपस्थित होते. दोघांनी भाषणे केली. सावरकर म्हणाले, ‘‘कोणत्याही राष्ट्रीय कारभारात आणि राष्ट्रकार्यात अल्पसंख्य गटाला योग्य तो वाटा देण्यास हिंदू महासभा सदैव तयार राहील. मुसलमानांना प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसने मात्र मुसलमानांना डोक्यावर बसविले आहे. बाबासाहेब म्हणाले, ‘‘जीना म्हणतात की कॉंग्रेसने मुसलमानांवर अन्याय केला. त्यांनी जर १०० आरोप केले असतील तर त्यातले फार तर पाच आरोप जीना सिद्ध करू शकतील. अस्पृश्यांचा पवित्रा फार तर कॉंग्रेसविरोधी म्हणता येईल, पण तो हिंदूविरोधी नाही.’’ प्रसंग लक्षात घेतले तर एक गोष्ट सिद्ध होते की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्या भेटी होत होत्या, प्रत्यक्ष संवाद होता. परस्परांविषयी आस्था, आदर, सदिच्छा भाव होता.