महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही
अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही. मुरूड जंजीरा किल्ला हा अजिंक्य किल्ला आहे.
किल्ला जवळ आला तरी दिसत नाही प्रवेशद्वार
मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा भव्य किल्ला बांधण्यात आला आहे. बंदरावर उतरल्यावर शिडाच्या होडीने किल्य्यावर जावे लागते. होडीतून प्रवास करताना किल्ला जस जसा जवळ येतो तसचं किल्याची भव्यता अगदी स्पष्टपणे दिसू लागते. या किल्ल्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे प्रवेशद्वार. या किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा पद्धतीने बांधण्यात आले की किल्ल्याच्या जवळ पोहचले तरी प्रवेशद्वार दिसत नाही. यामुळेच समुद्रात किल्ल्याच्या अवतीभोवती कितीही फेऱ्या मारल्या तरी प्रवेशद्वार कुठे आहे हे लक्षात येत नाही. यावरुनच या किल्ल्याची सुरक्षा किती मजबूत आहे हे लक्षात येते.
अजेय किल्ला
अलिबागच्या मुरुड बेटावर मुरूड जंजीरा किल्ला बांधण्यात आला. 22 एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. समुद्र किनाऱ्यापासून मुरुड-जंजिरा किल्ला 90 फुय उंचीवर आहे. या किल्ल्याच्या पायाची उंची 20 फुट एवढी आहे. या किल्ल्यावर 22 सुरक्षा चौक्या आहेत. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली. मजबूत बांधकाम, अभियंत्रीकी तंत्रज्ञानही फेल ठरेल अशी रचना, देखणं स्थापत्य आणि अत्यंत अचूक जागा यामुळे हा किल्ला जिंकणे कुणालाही जमले नाही. 350 वर्षांहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला सर्वांसाठी आव्हानात्मक राहिला. या किल्ल्याला आता जवळपास 500 वर्ष झाली आहेत. अनेक हल्ले, आक्रमणं झेलूनही हा किल्ला आजही हा किल्ला अजेय पराक्रमाची साक्ष देत आहेत.
मुरूड जंजीरा किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे?
समुद्रात मोठ्या दिमाखात उभा असेलला हा भव्य किल्ला किनाऱ्यावरुनच पर्यटकांना आकर्षित करतो. किल्ल्याचे बांधकाम अतिशय भक्कम आणि मजबूत आहे. किल्ल्याला 26 गोलाकार बुरुज आहेत. राजवाडे,अधिकाऱ्यांचे निवासस्थान, मशीद, 60 फूट खोल नैसर्गिक गोड्या पाण्याचे दोन तलाव, लालबांगडी, चावरी आणि लांडा कासम नावाच्या 3 विशाल तोफा हे मुरूड जंजीरा किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. या किल्ल्यावर एक भूमिगत भुयार आहे. रस्त्याप्रमाणे असणारे हे भुयार म्हणजे एक गुप्त मार्ग होता. समुद्राखाली 50 ते 60 फूट खोल राजपुरी गावापर्यंत हा रस्ता आहे. बाले किल्ला हे देखील मुरूड जंजीरा किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे.
मुरूड जंजीरा किल्ल्याचा इतिहास
राजापुरी येथील कोळी आणि मच्छिमार करणारे लोक मुरुड बेटावर आसरा घेत असतं. हा प्रदेश निजामांच्या ताब्यात होता. कोळी आणि मच्छीमार लोकांचे प्रमुख राजा रामराव पाटील यांनी निजामाच्या परवानगीने येथे मेढेकोट बांधला. निजामाला या किल्ल्याचे महत्व समजले. निजामाने पिरमल खान या सरदाराला किल्ला फत्ते करम्याची मोहिम दिली. पिरमल खान राजा रामराव पाटील यांच्यासह व्यापाऱ्याच्या निमित्ताने मेढेकोट येथे प्रवेश मिळवला. दारु पाजून राजा रामराव पाटील यांच्यासह त्याच्या सर्व सहकऱ्यांचा खात्मा करत हा मेढेकोट बळकावला. यानंरत येथे अभेद्य असा मुरूड जंजीरा किल्ला उभारण्यात आला. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी तब्ब्ल 8 वेळा प्रयत्न केले होते.
मुरूड जंजीरा किल्ल्यावर जायचे कसे?
मुंबईपासून 165 किमी अंतरावर हा किल्ला आहे. अलिबाग पासून जंजिरा किल्ल्याचे अंतरा 55 किमी आहे. अलिबाग शहरातून मांजरी, दिघी, दिवेआगार, श्रीवर्धनम आणि राजपुरी या गावातून किल्ल्यावर जाता येते. या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी बोट मिळते. राजपुरी किनाऱ्यावरून किल्ला खूप जवळ जवळ आहे. साधारण 5 ते 6 किमी इतके हे अंतर आहे. राजपुरी किनाऱ्यावरून शिडाच्या होडीने किल्ल्यावर जाता येते.