जिवंतपणी देव दिसतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर स्वामी विवेकानंदांची हकीकत वाचा!

जिवंतपणी देव दिसतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर स्वामी विवेकानंदांची हकीकत वाचा!


स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र. बंगालीत त्याचा उच्चार नोरेन असा होतो. हा नोरेन बालपणी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या मठात गेला. त्याचा आवाज अतिशय गोड होता, म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर त्याने रामकृष्ण परमहंस यांच्या समोर एक भजन सादर केले. ते ऐकून रामकृष्णांची समाधी लागली. त्यांचे देहभान हरपलेले पाहून नोरेन आश्चर्यचकित झाला. भजन संपवून त्याने रामकृष्णांना भानावर आणले. रामकृष्ण त्याला म्हणाले, 'नोरेन, थांबू नकोस, आणखी गा...' असे म्हणत असताना त्यांनी नोरेनच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची जशी समाधी लागली, तशी गाता गाता नोरेनचीदेखील समाधी लागली. एवढेच नाही, तर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नोरेन जेव्हा भानावर आला, तेव्हा भारावून गेला. 
नोरेनला ती समाधी अवस्था पुन्हा अनुभवायची होती. गुरुदेव म्हणाले, योग्य वेळ आली, की तू आपणहून ती अवस्था अनुभवशील. यावर नोरेनने पुढचा प्रश्न विचारला, 'पण गुरुदेव ती वेळ कधी येईल? मला देव कधी दिसेल?' 

यावर मंद स्मित करून गुरुदेव म्हणाले, 'मी मेल्यावर!'

नोरेन चकित होऊन गुरुदेवांकडे एकटक बघत बसला. त्यानंतर कित्येक महिने नोरेनची गुरुदेवांशी गाठ पडली नाही. मात्र, गुरुजींच्या उत्तराने नोरेन अस्वस्थ झाला. त्याने गुरुदेवांना भेटायचे ठरवले. त्यांचे शिष्यत्व पत्करायचे ठरवले. गुरुंच्या ओढीने नोरेन रामकृष्णांच्या भेटीस गेला. आश्चर्य काय, तर तेदेखील नोरेनची व्याकुळतेने वाट बघत होते. तिथे गेल्यावर पुन्हा नोरेनला तिच अनुभूती आली. क्षणभर ती अवस्था अनुभवल्यानंतर त्याने गुरुदेवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, 'गुरुदेव, मला देव कधी दिसेल?'

नोरेनचा प्रश्न ऐकून गुरुदेवांनी पुन्हा तेच उत्तर दिले.


आता मात्र, नोरेननी हट्टच धरला. देव पाहिल्याशिवाय त्यांच्या मठातून जाणार नाही, असे त्याने गुरुदेवांना निक्षून सांगितले. आणि तो मठात राहू लागला. आज न उद्या गुरुदेव आपल्याला देव दाखवतील या आशेवर नोरेन रात्रंदिवस वाट पाहू लागला. मात्र, गुरुदेवांचे `मी मेल्यावर' हे उत्तर ऐकून तो अस्वस्थ होत असे. 
एके दिवशी पहाटे गुरुदेव आणि सर्व शिष्य नदीवर स्नानासाठी गेले असता, गुरुदेवांनी नोरेनचे लक्ष नसताना त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. काही क्षण पाण्याखाली राहिल्यावर, नाका-तोंडात पाणी गेल्यावर नोरेन उसळी मारून बाहेर आला आणि म्हणाला, `गुरुदेव, हे काय करताय, मी मरेन ना?'
गुरुदेव स्मित करून म्हणाले, `नोरेन हेच अपेक्षित आहे. देवाला भेटायचे, तर एवढी अस्वस्थता निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो. नोरेनला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि गुरुंच्या ठायी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. याच नोरेनने गुरुंच्या सान्निध्यात राहून स्वत: देव पाहिला आणि भविष्यात लोकांनाही दाखवला.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने