रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल झकास हे कसं ठरवणार?

रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल झकास हे कसं ठरवणार?



सुग्रास जेवण म्हटलं की झणझणीत कट हे चित्र डोळ्यासमोर येतं. रश्श्यावर हा कट येण्यासाठी तेलाचाही मुबलक वापर केला जातो. सध्या रिफाइंड तेलाचा वापर वाढत असला तरीही त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. परिणामी आरोग्य जपण्यासाठी आहारात घाण्याचे तेल सर्वोत्तम असल्याचं आहारातज्ज्ञ सांगतात.
आयुर्वेदात बऱ्याचशा तेलांचे गुणधर्म, उपयुक्तता दिलेली आहे. मात्र तेलात असलेले चरबीचं प्रमाण तेवढेच मनुष्याच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. तेलाच्या गुणधर्माबरोबरच ते कसे तयार केले जाते याची माहिती असणे गरजेचे आहे. तेलाच्या बाबत रिफाइंड हा शब्द घातक आहे. तेल चांगले दिसण्यासाठी ते गंधरहित होण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तेलातील पौष्टिकमूल्य संपुष्टात येतात. त्यामुळे रिफाइंड तेलाऐवजी घाण्याचे तेल खाणं आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरतं, असं  आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.



एका माणसाला किती तेल आवश्यक?

* तेल कुठलंही खाल्लं तरी ते काढताना किंवा काढल्यानंतर त्यात उष्ण तापमानाचा वापर होऊ नये. तेलाचे प्रमाण हे ७५०-९०० मिलिलिटर प्रती व्यक्ती प्रती महिना असणं गरजेचं आहे.

* आहारात तेलाचा सढळ हातानं होणारा वापर, कर्बोदकांचं अतिरिक्त प्रमाण आणि प्रथिनांची कमतरता आणि शून्य व्यायाम हेच सगळ्या आजाराचे मूळ आहे.

* प्रौढांच्या आहारात  दोन ते तीन टीस्पून तेल असावे. स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही हे प्रमाण सारखंच आहे. पण व्यक्तिपरत्वे तेलामध्ये बदल होऊ शकतो.



घाण्याचे तेल

तेलबियांना उष्णता न देता फक्त दाबून जे तेल काढलं जातं ते घाण्यावरचं तेल असते. हे तेल आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं. या प्रकारे बनवलेल्या तेलाची जडणघडण बदलत नाही. त्यात रासायनिक, हानिकारक द्रव्यं मिसळलेली नसतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम असतात.
पॅकिंगमधलं रिफाइंड तेल

तेल चांगलं दिसावं, ते गंधरहित व्हावं यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले तेल म्हणजे रिफाइंड तेल. प्रक्रियेदरम्यानची रासायनिक द्रव्यं शरीरासाठी हानिकारक ठरून कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात. तेल काढताना केलेल्या प्रक्रियेमुळे तेल बियांमधील आवश्यक आणि चांगली तत्वं नष्ट होतात.


तळण्यासाठी कोणते तेल वापरावं?
कोणत्याही तेलाचं अतिसेवन आरोग्याला अपायकारकच असतं. शरिरात वंगणासाठी तेल उपयुक्त असतं. करडई किंवा शेंगदाणा तेल हे तळण्यासाठी उत्तम आहेत. मात्र पदार्थ तळल्यानंतर त्यातील अतिरिक्त तेल पूर्ण शोषलं जाईल याची व्यवस्था करणं आवश्यक आहे.



घाण्याचे तेल सर्वोत्तम!

ज्या तेलावर सर्वात कमी प्रक्रिया केली जाते ते तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगलं असतं. पॅकिंग तेल दोनदा फिल्टर होत असल्यानं त्यातील आवश्यक सत्व नाहीसे होतात. घाण्यातून काढलेले खाद्यतेल कधीही आरोग्यासाठी चांगलंच असतं. त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणा, मोहरी, खोबरे आणि सूर्यफूल यांचं घाण्याचे तेल आरोग्यासाठी उत्तम असतं.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने