ऑनलाइन फ्रॉडमध्ये गेलेले पैसे 24 तासांत मिळू शकतात परत; फक्त करा हे छोटं काम
अलीकडे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत (Cyber Fraud) बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचा कष्टाने कमावलेला पैसा अगदी हातोहात चोरांच्या खिशात जात आहे. यापासून दिलासा मिळण्यासाठी केंद्र सरकारने एक यंत्रणा उभी केली असून, तिचा वापर करणं सोपं आहे. कुणी चुकून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला (Online Fraud) बळी पडलंच, तर चोरीला गेलेले पैसे 24 तासांच्या आत पुन्हा अकाउंटला येतील, अशी व्यवस्था या यंत्रणेत तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेची माहिती घेऊ या.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) विकसित केलं आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx ही त्याची लिंक आहे. या वेबसाइटवर 155260 (1930) हा हेल्पलाइन नंबर (Helpline) देण्यात आला आहे. तो आपल्या फोनच्या काँटॅक्ट्समध्ये सेव्ह करून ठेवावा.
दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातले नागरिक या हेल्पलाइन क्रमांकावर आठवड्याच्या सातही दिवशी कोणत्याही वेळी कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. अन्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खुला असतो. त्या वेळेत तक्रार नोंदवता येऊ शकते.
समजा, तुम्ही दुर्दैवाने ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडला असाल, तर 155260 (1930)या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुमची तक्रार दाखल करावी लागेल. तक्रार दाखल करताना नेमकी कशा प्रकारची फसवणूक झाली आहे याची पूर्ण माहिती द्यावी. ही फसवणूक कोणत्या वेळी घडली याची माहिती द्यावी. तसंच तुमचं बँक खातं, पत्ता, तसंच तुमचे पैसे ज्या बँक खात्यात (Bank Account) किंवा (PhonePe, Google Pay, PatTM इत्यादी) ई-वॉलेटमध्ये (E-Wallet) ट्रान्स्फर झाले असतील, त्याची पूर्ण माहितीही या कॉलमध्ये द्यावी. हे लक्षात घ्या, की तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच पुढचा तपास होतो आणि तुमचे पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे माहिती अचूकपणे दिली जाईल, याची काळजी घ्या.
या पोर्टलवर सर्वांच्या मदतीसाठी एक व्हर्च्युअल असिस्टंटही (Virtual Assistant) उपलब्ध करण्यात आला आहे. या कम्प्युटराइज्ड असिस्टंटला नाव देण्यात आलं आहे सायबर दोस्त (Cyber Dost). या दोस्ताच्या मदतीनेही तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता.
ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
ही यंत्रणा कशा प्रकारे काम करते, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. त्याचे टप्पे जाणून घेऊ या. 155260 (1930)या क्रमांकावर तुम्ही कॉल केला, की तो सायबर क्राइम विभागाच्या कॉल सेंटरवर पोहोचतो. तुमच्याकडून सायबर फसवणुकीबद्दलची सर्व माहिती घेऊन ती रेकॉर्ड केली जाते. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तुमचे पैसे ज्या बँक खात्यात पोहोचले असतील, ते खातं सायबर क्राइम सेलद्वारे गोठवलं जातं. त्यामुळे ते खातं ज्या कोणाच्या मालकीचं असेल, ती व्यक्ती खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा कुठे ट्रान्स्फरही करू शकत नाही.
तुम्ही केलेली तक्रार खरी आहे, याची शहानिशा केली जाते. त्यानंतर तुमच्या खात्यातून जेवढे पैसे वळते झाले असतील, ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात पाठवले जातात. ज्या बँकेच्या खात्यात ते पैसे गेले असतील, त्या बँकेकडून ही प्रक्रिया केली जाईल.
आता असा प्रश्न मनात येईल, की समजा एखाद्या चोराने एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली आणि त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये ते पैसे काढून घेतले, तर काय होईल?
या संदर्भात आम्ही सायबर क्राइमच्या दिल्ली शाखेशी संवाद साधला, तेव्हा असं सांगण्यात आलं, की असं झालं असेल, तर ती तक्रार तक्रारदाराच्या स्थानिक पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जाईल. नंतर अन्य गुन्ह्यांप्रमाणेच ते पोलिस आरोपींना पकडून त्यांच्यावर पुढची कारवाई करतील.
- या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
- तुम्ही सायबर फ्रॉडला बळी पडलात, असं लक्षात आलं, तर जराही वेळ न दवडता तातडीने 115260 या क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करा.
- मुळात अशी फसवणूक होणारच नाही, यासाठी दक्ष राहा. कोणीही अनोळखी व्यक्तीने बँकेचे डिटेल्स मागितले किंवा ओटीपी मागितला, तर देऊ नका.
- अनोळखी कॉल आल्यास चुकूनही जास्त वेळ बोलू नका. बोलण्यात गुंतू नका.
- फोनवर कोणती लिंक आली आणि त्यावर क्लिक करायला सांगण्यात आलं असेल, तर त्यावर क्लिक करू नये.
- अखंड ते सावधपण हे तत्त्व कायम अंगी बाळगावं.