आनंदराव कांबळे-पळशीकर यांचा वाडा
____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुका आहे,या पारनेर तालुक्यात "पळशी" नावाचे गाव आहे. गाव तसे इतर खेडयासारखे असले तरी ते इतिहासात प्रसिद्ध आहे.या गावात गढी सारखा भुईकोट किल्ला आहे.तो भुईकोट किल्ला व येथील वाडा होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे यांचा आहे.
गावात पोहोचताच देखणा भुईकोट किल्ला तुमचे लक्ष वेधून घेतो.लांबुनच एवढा सुंदर दिसणारा किल्ला पाहिल्यावर तेथे कधी एकदा असे वाटल्याशिवाय राहत नाही.भुईकोट किल्ला असल्याने गावाला सुरेख रेखीव तटबंदी बांधण्यात आली आहे.दोन दिशाना दोन प्रवेशद्वार आहेत.उत्तर बाजुच्या प्रवेशद्वारावर शिलालेख कोरला असुन,भुईकोट किल्ला कधी बांधला याचा उल्लेख दिसुन येतो.शके १७०९ मध्ये पळशी या गावात या गढीच्या/किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली त्या वेळची मराठी तिथीही दिलेली दिसते.तसेच १७१९ साली काम पूर्ण झाल्याचीही माहिती मिळते.
पळशी गावचे मुळ वतनदार रामराव यादव- कांबळे पळशीकर यांचे चिरंजीव आनंदराव रामराव पळशीकर हे पेशव्यांकडे सुभेदार होते. असे सांगण्यात येते की, पानिपतचे तिसरे युध्दात (१७६१) त्यांनी विशेष पराक्रम गाजविला व आनंदराव पळशीकर सरसेनापती झाले.त्यांना हे गाव इनाम मिळाले आहे. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,महादेव मंदिर देखणे व रेखीव असुन मंदिराचं हे वास्तुस्थापत्य मात्र आवर्जून पाहण्यासारखंच आहे. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नसावा हे खरोखरीच आश्चर्यकारक वाटते. गाभाऱ्यात सुरेख शिविपिंडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत.या महादेव मंदिरा बरोबरच दुसरे एक राही-रखुमाईचे मंदिर सुध्दा तेवढेच देखणे व प्रसिद्ध आहे.मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते.
महादेव मंदिरालगत पळशीकरांचा लाकडी वाडा आहे.. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे.नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.सुंदर कोरीव लाकडी नक्षीकाम आणि एक संघ लाकडातील कला सोबतीला खांबांचे नक्षीकाम आणि स्थापत्य बघून मन तृप्त होते. येथे आपल्याला चौकात स्नानासाठी त्याकाळी वापरला जाणारा भव्य पाट बघायला मिळतो.इथेच या वाड्याचे सध्याचे मालक रामराव कृष्णराव पळशीकर व त्यांचे वडील कृष्णराव पळशीकर यांचे फोटो बघायला मिळतात. हे बघून आपण वाड्याच्या प्रत्येक खांबाचं नक्षीकाम अगदी बारकाईने बघायचं. उजव्या हाताला आपल्याला देवघर बघायला मिळते, याच देवघरात त्या काळी सोन्याचे देव होते असं सांगितलं जाते परंतु आता ते बंद आहे.आता आपण जिन्याच्या शेजारी असलेल्या भव्य राहण्याच्या खोलीत जायचे. या खोलीत जात्याच्या भव्य तळी आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक भव्य तळमजल्याला जाण्याचे द्वार आहे. इथून आजही कोणी खाली जाऊन बघितलं नाहीये. अजून एक इथेच भुयारी मार्ग बघायला मिळतो. वाड्यातील एक भुयारी मार्ग देवीच्या मंदिराकडे, दुसरा महादेव मंदिराकडे आणि आणखी एक विठ्ठल मंदिराकडे म्हणजेच किल्ल्याच्या बाहेर पडतो असे सांगितले जाते.
पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे.
नगर जिल्ह्यात कधी गेला तर अवश्य या पळशी गावाला भेट दया.
*कसे जाल:* पळशी किल्ल्याला भेट द्यायला जायचे असेल तर टाकळी ढोकेश्वर मधून वासुंदे गावाकडे येऊन खडकवाडी मधून उजव्या हाताला गेल्यावर आपल्याला पळशी किल्ल्याची तटबंदी दिसेल. आपण संगमनेर कडून आलात तर मांडवे गावातील मुळा नदीचे निसर्गरम्य पात्र बघून खडकवाडी मधून डाव्या हाताला पळशी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे.
माहिती सेवा ग्रूप
फोटो: एतिहासिक वाडे व गढी याफेसबुक पेजवरून साभार.