पिंजरा चित्रपटातील गुलब्या

 पिंजरा चित्रपटातील गुलब्या

✍️लेखन  - अर्चना बनगे

कोल्हापूर म्हणजे कलापुरातील भजनी परंपरा असो किंवा नाटक, चित्रपटांत अनेक मुस्लिम कलाकार यशोलौकिकाचे शिलेदार ठरले आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

पिंजरा चित्रपटातील गुलब्या

काही मुस्लिम कलाकारांना तर नमाज येतही नव्हती. मात्र, ते भजनात तल्लीन व्हायचे. काही भजनी मंडळांनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम ऐक्‍यावर भर देणारी सोंगं आणि अभंग भजनात आणले. भजनाचे कार्यक्रम मुस्लिमबहुल भागात केले आणि त्यातून सलोखा आणखी घट्ट केला.रंकाळा तालमीचे दत्तपंथी भजन पूर्वी फार प्रसिद्ध. राज्यभरात या भजनाचे कार्यक्रम व्हायचे. शरफुद्दीन मुजावर या भजनातील प्रमुख कलाकार. पंचावन्न वर्षांपूर्वी या भजनाचा कार्यक्रम मिरज नगरपालिकेसमोर होता आणि निमित्त होते शिवजयंतीचे.

परिसर तसा संवेदनशील. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही मोठा होता. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांतील लोक भजन पहायला. भाळी अष्टगंध लावून भजनात तल्लीन झालेल्या शरफुद्दीन मुजावर यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍यावर साद घालणारा अभंग सादर केला आणि दोन्ही समाजातील लोकांनी त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घातले होते.

मराठी सिनेसृष्टीत 'पिंजरा' हा चित्रपट गाजला. किंबहुना आजही तो रसिकांना भुरळ घालतो. या चित्रपटाबरोबरच 'गुलब्या' ही मास्टर आबू यांची भूमिकाही अजरामर झाली. मास्टर आबू म्हणजे आबासाहेब ऊर्फ मास्टर आबू राजेखान वटंमुरीकर. शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनयाची आवड. किरण संगीत मेळ्यांतून त्यांची कारकीर्द सुरू झाली तरी त्यांना क्रिकेटचेही प्रचंड वेड.

मुंबईतील भारत-पाकिस्तान कसोटी सामन्यावेळी ते भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला गेले. तेथे जवळच्याच स्टुडिओमध्ये चित्रपटांचे शूटिंग सुरू असायचे. तिथेच मग त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका मिळू लागल्या. मात्र, त्यांना खरी संधी मिळाली ती 'पिंजरा' या चित्रपटात. अभिनेत्री संध्या आणि श्रीमती वत्सला देशमुख यांच्यासोबत तमाशाच्या बोर्डावर 'गुलब्या' नावाची नाचाची ही भूमिका. चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. 'लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती' या मालिकेत तर त्यांनी वेगवेगळ्या पाच भूमिका साकारल्या.

महाराणा प्रताप चौक परिसरात राहणारे संगीत दिग्दर्शक के. सिकंदर हे तर मराठी नाटक, चित्रपट आणि भजनातही सक्रिय. सगळ्या देव-देवतांचे अभंग त्यांना तोंडपाठ. विविध देव-देवतांच्या भक्तीगीतांच्या कॅसेटसाठी त्यांनी संगीत संयोजन केलं. हा माणूस आयुष्यभर हिंदू पद्धतीनेच जगला आणि शेवटच्या टप्प्यात नमाजासाठीही जावू लागल्याच्या आठवणी कला क्षेत्रातील ज्येष्ठ सांगतात. शरफुद्दीन मुजावर, मास्टर आबू असोत किंवा के. सिकंदर असोत ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. पण, आजही अशी कैक माणसं शहराच्या जुन्या पेठांसह विस्तारलेल्या विविध उपनगरांतूनही आवर्जून भेटतात.

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने