बौद्ध पंथातील गणपतीची रूपे...

 


  बौद्ध पंथातील गणपतीची रूपे...








काही देवता लोकपरंपरेतून विकसित होऊन मुख्य देवतांच्या बरोबरीला येऊन बसतात.गणपती हा त्यापकीच एक. त्याला केवळ बरोबरीचे स्थान न मिळता अग्रपूजेचा मानही आहे. दु:खकारक ते दुखहारक असा या विनायकाचा प्रवास विविध सांस्कृतिक टप्प्यांतून झाला. हा गणेश विविध नावांनी तसेच विविध रूपांनी ज्ञात आहे. त्याचे संपूर्ण स्वरूप कळणे हे सामान्य बुद्धीच्या आकलनापलीकडले आहे. ही परिस्थिती भारतातली, िहदू परंपरेतली, जिथे तो विकास पावला, तिथली असेल तर मग इतर परंपरा आणि देशांमधील त्याचे स्वरूप समजून घेणे किती अवघड आहे याची कल्पनाच करावी.'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे.त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. 

बौद्ध पंथातील गणपतीची रूपे...

 
श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता.तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली.या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मात अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती.

इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.

अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.

बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुली चारुमतीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे.त्यामध्ये तिने स्वत: श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे . त्याचे नाव आहे,"सूर्यगणपती "पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले.वरील छायाचित्रात गणपती च्या सगळी कडे बुद्ध बसलेले आहेत...

पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे.त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते. ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत.या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,जावा बौद्ध धर्म मानणारा देश आहे.यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते. नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात.ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे.नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे. त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.'

साधारण सातव्या-आठव्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावाने विघ्नकारी भूत अथवा दानव म्हणून गणेशाला स्थान मिळाले होते. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्धतांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्याचे मंत्र, धारणी, मुद्रा आणि त्याच्याशी संबंधित विधी यांची मोठी रेलचेल या साहित्यामध्ये पाहायला मिळते. इ.स.च्या आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या एका ग्रंथात असे म्हटले आहे की, ‘एक दिवस-रात्र अथवा तीन दिवस उपास करून, अधिष्ठान करून,  विशिष्ट मंत्र १०८ वेळा म्हटल्याने विनायक व त्याने निर्मिलेली अरिष्टे दूर होतात. भिक्षूला ध्यानधारणेसाठी चित्त एकाग्र करता येते.’

अतिगुप्ताने इ. स. ६५४ मध्ये चिनी भाषेत भाषांतरित केलेल्या ‘धारणीसमुच्चय’या ग्रंथात विनायकाशी संबंधित एका विधीची माहिती येते. यात ‘आिलगनावस्थेतील, स्त्री-पुरुष स्वरूपातील, गजवदन व नरदेह असलेल्या दोन मूर्ती बनवाव्या. कृष्णपक्षातील प्रतिपदेला त्यांची विशिष्टविधी आचरून स्थापना करावी. त्याला १०८ वेळा मंत्र म्हणून तीळाच्या तेलाचा अभिषेक करावा.

यामुळे विघ्नांचा नाश होऊन, दुर्दैव दूर होण्यास मदत होते.’ विनायकाचे हे स्वरूप महत्त्वाचे आहे, कारण यातूनच पुढे जपानमध्ये पाहायला मिळणाऱ्या गणेशद्वय मूर्तीचा विकास झाला असावा.जपानी बौद्ध मूर्तिशास्त्रामध्ये गणेशाचे तीसहून अधिक मूर्तिप्रकार दिसतात. त्यापकी काही प्रमुख प्रकार हे गणेशद्वय अथवा विनायकद्वय स्वरूपाचे आहेत. त्यांपकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ‘कंगी’ विनायकद्वय. त्यांच्या अनेक कथा जपानी बौद्ध परंपरेत लोकप्रिय आहेत.

बौद्धांच्या पूर्व आणि आग्नेय आशियामधील गणेश-विनायक परंपरेत गणेशाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रमुख पलू दिसतात. एक म्हणजे त्याचे विघ्नकर्ता म्हणून असलेले प्राचीन स्वरूप, जे त्याच्या यक्ष कोटीतील व्यक्तिमत्त्वाशी साधम्र्य सांगते आणि दुसरे म्हणजे त्याचे विघ्नहर्ता हे रूप. ते पूर्व मध्ययुगीन काळातील भारतातील त्याच्या पूर्ण विकसित देवता स्वरूपाशी साधम्र्य दाखवते. भारतातूनच विविध कालखंडांत विविध माध्यमांतून या विलक्षण देवतेच्या संप्रदायाचा प्रसार इतर देशात झाला. तो कधी भिक्षूंनी केला तर कधी व्यापाऱ्यांनी.

तिबेटमधे गणेशाशी संबंधित विपुल ग्रंथरचना झाली. त्याचे स्वरूप मुख्यत: भाषांतरित धार्मिक साहित्याचे आहे. त्याचे वर्गीकरण विद्वानांनी आठ प्रकारांत केले आहे. मूळ बौद्ध तंत्रग्रंथ, मूर्तिशास्त्रावरील ग्रंथ, बली आणि होम विधींशी संबंधित ग्रंथ, दुष्ट विनायकाशी संबंधित ग्रंथ, साधना, स्तोत्र व स्तुती ग्रंथ आणि काम्य ग्रंथ. या भाषांतरित ग्रंथांचे मूळ संस्कृत ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. हे जवळजवळ सर्व ग्रंथ तंत्रसाधनेशी संबंधित आहेत. वस्तुत: तिबेटी बौद्ध धर्माचे तंत्रसाधना हे एक वैशिष्टय़ असल्याने तेथील गणेशाचा संप्रदाय तंत्रसाधनेचा एक भाग असणे साहजिकच आहे. उदाहरणार्थ ‘महागणपतीतंत्राच्या’ तिबेटी भाषांतरामध्ये अकरावा अध्याय हा महागणपती मंडलाचे वर्णन करणारा आहे. ‘महाविनायक रूप उपदेशरत्न’ या ग्रंथात त्याचे वर्णन येते. त्याला हत्तीचे तोंड असून, चार हात आहेत. तो त्रिनेत्र आहे. त्याचे सुळे धारधार असून, चेहरा उग्र आहे. तो नरमुंडमाला धारण करतो आणि व्याघ्रचर्माचे वस्र परिधान करतो.’ असे भयानक रूप धारण करणारा हा देव आहे. परंतु अभावाने का होईना त्याची सौम्यरूपेही आपल्याला आढळतात.

तो ज्या मातीत गेला तिथलाच झाला आणि तेथेच रमला. लोककथांमधून त्याने आपली िहदू धर्माशी असलेली नाळ कायम ठेवली. चीन आणि जपानमध्ये तो चांगल्या-वाईटाच्या युगुलामध्ये अवतरला. ते तेथील परंपरेला साजेसेच होते. आग्नेय आशियामध्ये त्याने आपली हिंदू किंवा बौद्ध ही ओळख टिकवूनही त्यातील दुरावा नाहीसा करण्यात यश मिळवले. तर तिबेटमध्ये तंत्राचा भाग होऊन तेथील लोकधर्मात मिसळून गेला. गणेशाची हीच तर खासियत आहे. म्हणूनच तो आजही आबालवृद्धांना आपलासा वाटतो.


Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने