एकादशीचा उपवास करता, पण “एकादशी” म्हणजे नेमकी कोण? कधी विचार केलात?

एकादशीचा उपवास करता, पण “एकादशी” म्हणजे नेमकी कोण? कधी विचार केलात?


एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणत दर एकादशीला उपवासाच्या खमंग पदार्थांवर ताव मारला जातो. आजही अनेक घराघरात एकादशी अत्यंत मनोभाव केली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी पुजा, त्यानंतर उपवास, हरिनामाचा जप असा कार्यक्रम अनेक घरांत केला जातो. मात्र एकादशी म्हणजे नेमकं काय? या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली? ही एकादशी म्हणजे कोण? भगवान विष्णुशी या दिवसाशी काय नाते आहे? या सगळ्यांची उत्तरे मिळवलीत तर हा दिवस साजरा करण्याचा आनंद काही औरच असेल.
हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व असतं. भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो आणि एकादशीला हरिदिनी असेही म्हणले जाते. एकादशी ही विष्णूच्या साधनेसाठी असली तरिही ती वैष्णव आणि स्मार्त सर्वांत करतात.
या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करुन दुसर्‍या दिवशी पारणं केलं जातं. वर सांगितल्यानुसार एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील तेंव्हा पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते.
एकादशी हा हिंदू पंचागानुसार प्रतिपदेपासून सुरू होणार्‍या पक्षातला अकरावा दिवस असतो. हिंदू पंचागानुसार महिन्यातून दोन एकादशी येतात. या महिनाभरातल्या नेहमीच्या एकदाशा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षभरात २४ एकदशा येतात. त्यांना विविध नावांनी ओळखले जाते-


अशीही एक आख्यायिका
मूर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकून घेतले आणि तो कोणाही देवाला जुमानेसा झाला. स्वत: विष्णू युध्दात उतरले. मात्र मूर दैत्याला ब्रह्मदेवानी असा वर दिला होता की मूर कधीही पुरुषाकडून अवध्य राहिल. कोणताही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही.
विष्णूंनी माया रचली. अविश्रांत चाललेल्या या युध्दामुळे थकल्याची बतावणी त्यांनी मूरदैत्याकडे केली. विश्रांती घेण्यासाठी ते बदरिकाश्रमी एका गुहेत जाऊन पहुडले. बराच काळ लोटला तरिही ते पर आले नाहीत म्हणून मूर दैत्यानं गुहेवर हल्लाकेला आणि निद्रिस्त विष्णूंवर शस्त्र उगारलं, याचवेळेस निद्रिस्त विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिनं मूर दैत्याशी युध्द केलं आणि त्याचा नाश केला.
विष्णूंच्या अकराव्या इंद्रियाद्वारे म्हणजेच मनाद्वारे या देवीची उत्पत्ती झाली म्हणून तिचे नाव एकादशी पडले.विष्णूंनी मायाशक्तीद्वारे मुर दैत्याचा नाशकेला म्हणून मुरारी हे नाव पडले.
यंदा २६ मेला अपरा एकादशी आहे. या अपरा एकादशीची कथा अशी सांगितली जाते.

अपरा एकादशी कथा

महीध्वज नावाचा एक धार्मात्मा राजा होता. त्याचा धाकटा भाऊ, वज्रध्वज त्याच्यावर खार खाऊन होता. एके दिवशी संधी साधून त्यानं वज्रध्वजानं महिध्वजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात नेऊन पिंपळाच्या वृक्षाखाली पुरला. अकाली मृत्यू झाल्यानं महिध्वजाचा आत्मा पिंपळावर लटकून बसला आणि त्या वृक्षासमोरुन येणार्‍या जाणार्‍या वाटसरूंना त्रास देऊ लागला.
एकेदिवशी एक ऋषी त्या मार्गावरुन जात असताना त्यांना हा अतृप्त आत्मा दिसला आणि त्यांनी या आत्म्याची विचारपूस करुन तो उपद्रव का देतो याचं कारण विचारलं. कारण समजल्यानंतर या ऋषिंनी आत्म्याला वृक्षावरुन खाली उतरवलं आणि परलोक विद्येचा उपदेश दिला.
या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून स्वत: ऋषींनी अपरा एकादशीचं व्रत केलं. द्वादशीला पारणं सोडून व्रताचं पुण्य अतृप्त आत्म्याला दिलं आणि त्याला सदगती प्राप्त झाली.न जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटका होण्यासाठी ही एकादशी महत्वाची मानली जाते.
अशाचप्रकारे प्रत्येक एकादशीचं महत्व सांगाणार्‍या कथा पुराणात सांगितल्या आहेत. प्रत्येक एकादशीच्या व्रताचं फ़ळ निराळं आहे.
या चोवीस एकादश्यांतील आषाढी आणि कार्तिकी अशा दोन मोठ्या एकादशा मात्र सर्वत्र केल्या जातात. आषाढ शुध्द एकादशीला आषाढी आणि कार्तिक शुध्द एकादशीला कार्तिकी असं म्हणलं जातं.
आषाढी एकादशीला शेषशायी भगवान विष्णू झोपी जातात आणि ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेले असतात अशी धारणा आहे. यामुळेच आपल्याकडे आषाढ शुक्ल ११ ला चातुर्मास चालू होतो तो कार्तिक शुक्ल ११ ला तो संपतो. या चार महिन्यात धार्मिक वृत्तीची माणसं अनेक व्रतवैकल्यं करतात. आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुध्द पक्षातील अकराव्या तिथीला प्रथमा एकादशी/ महा एकादशी / देव शयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. या दिवसाचं धार्मिक महत्व मोठं आहे.
अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी) ही योगनिद्रा संपते. या काळात मांसाहार वर्ज्य मानला आहे.
चैत्रापासून फाल्गून मासातील शुक्ल पक्षातील एकादशींची नावे- कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा आणि आमलकी.
कृष्णपक्षातील एकादशींची नावे- पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षटतिला व विजया.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने