वेडात मराठे वीर दौडले सात; या वीरांच्या पराक्रमाबद्दल आणि ‘त्या’ किल्ल्याबद्दल ठाऊक हवंच

वेडात मराठे वीर दौडले सात; या वीरांच्या पराक्रमाबद्दल आणि ‘त्या’ किल्ल्याबद्दल ठाऊक हवंच



महाराष्ट्र! नुसते नाव उच्चारले तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. राकट, कणखर, दगडांचा देश, पण हृदयात अनेक निरागस भावना जपणारा असा महाराष्ट्र.
शिव छत्रपतींच्या सहवासाने पावन झालेला देश! अनेक नरवीरांच्या पराक्रमाचे गोंदण लाभलेला देश, महाराष्ट्र! अनेक कथा आणि व्यथा या महाराष्ट्राने अनुभवल्या. त्यातलीच एक, कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर यांची कथा आणि व्यथा. ही कथा ज्या भू भागाने अनुभवली त्याच्यासह चला जाणून घेऊ प्रतापराव आणि त्या भू भागाची कहाणी!
‘कुडतोजी जाधव’ हे शिवाजी राजांच्या सरदारांपैकी एक, ज्यांनी गुजरात प्रांतात बहुत मोठा पराक्रम गाजवला यासाठी त्यांना महाराजांनी ‘प्रतापराव’ या पदवीने नावाजले. म्हणजे गुजरात प्रदेशात म्हणजे गुजरांच्या प्रदेशात प्रताप आणि पराक्रम केला असे ते प्रतापराव गुजर.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्ऱ्यावरून परतीनंतर प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहात गेलेले अनेक दुर्ग परत जिंकून घेतले. साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या समोरासमोरच्या लढाईत त्यांनी मुघल सरदार इखलास खान व बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडविला.


प्रतापराव गुर्जर हे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले. ई.स.१६४७ मध्ये अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेकात न्हाऊन निघाला असताना स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर मात्र त्यापासून वंचित राहिले. त्याचवेळी बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता; रयतेचा छळ करत होता. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.
शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना खानाचा वध करा असे आदेश दिला. प्रतापराव गुजर यांनी गनिमी काव्याने खानास उमाराणीच्या (जत तालुका, सांगली जिल्हा) डोन नदीच्या पात्रात जाऊन त्यांचा सैन्याचा पाणीपुरवठा बंद केला व तिथे खाना सोबत युद्ध झाले.


वेळप्रसंग पाहून खान शरण आला. प्रतापराव गुर्जर हे मेहेरबान झाले. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असे त्यांचा शिपाईधर्म सांगत होता. त्यांनी खानास सोडून दिले. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचली.
आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली.
त्या पत्रात एक वाक्य असे होते, की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. ही शिक्षा भयंकर होती. प्रतापराव गुर्जर निराश झाले; दुःखी झाले. प्रतापरावांनी वेळ न घालवता सैन्य घेऊन खानाचा शोध घेण्यास सुरुवात केली.


त्यांनी ठरवले “खानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला असताना जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला गेले होते. त्याचवेळी त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे.
जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. प्रतापराव गुर्जर यांना राग अनावर झाला. सैन्य येईपर्यंत थांबणे त्यांना मंजूर नव्हते. त्यांनी आपल्या सरदारांना घेऊन चढाई करायचा निर्णय घेतला.
सात मराठ्यांनी पंधरा हजारच्या सैन्यावर हल्ला केला. [(१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुर्जर] त्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत. आपण मृत्यूकडे जात आहोत हे माहिती असूनही ते घाबरले नाहीत.
स्वराज्याचा शत्रू बहलोल खान हाती गवसलेला असताना, जत भागातील उमराणी जवळ त्यांनी त्याला धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महाराजांचे धोरण विसरण्याची चूक या मानकर्‍याकडून झाली होती.
अपेक्षेप्रमाणे बहलोलखान गडहिंग्लजमार्गे कोल्हापूर प्रांतात शिरायची तयारी करु लागला. त्याची छावणी नेसरीजवळ आहे ही खबर प्रतापरावांना लागली आणि लगोलग ते उठले आणि त्यांना डोळ्यासमोर फक्त बहलोल खान दिसू लागला, घोड्यावर मांड ठोकून ते वार्‍याच्या वेगाने बहलोलखानावर निघाले.
आपला सरदार निघालाय हे पाहून त्यांच्या बरोबर विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, विठोजी आणि सिध्दी हिलाल हे सरदार पाठोपाठ निघाले. यावेळी त्यांच्याकडे १२०० ची फौज होती, पण केवळ सूड डोक्यात थैमान घालत असल्याने योग्य संधीची वाट पहावी व खानाला कापून काढावे इतकेही भान प्रतापरावांना राहिले नाही..
तुफान वेगाने सात घोडेस्वार १५००० हशमांच्या गर्दीत शिरले आणि बघता बघता नाहीसे झाले. महाशिवरात्रीला (२४ फेब्रुवारी १६७४) अजून एक खिंड रक्ताने न्हाऊन निघाली आणि पवित्र झाली.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात: वेडात मराठे वीर दौडले सात’ या गाण्यात ज्या वीरांचा उल्लेख आहे ते स्वराज्याचे खंदे वीर आणि त्यांच्या शौर्यगाथेचा हा करुण प्रसंग दुरवरून एक प्राचीन दुर्ग खिन्न मनाने पहात होता.


कदाचित तुझ्या राजाने एखाद्या गडाचा आश्रय घेऊन, गनिमी काव्याने मोठ्मोठे शत्रू नमविले, तू ही तसेच का केले नाहीस? हा प्रश्न कुडतोजी गुजर यांना विचारत आणि त्यांच्या हौतात्म्याची ही खंत बाळगत आजही तो गड मुक उभा आहे, या प्रसंगाचा साक्षीदार असलेला तो गड म्हणजे “सामानगड”!
या राकट सहयाद्रीने आपल्या अंगाखांद्यावर जे अनेक किल्ले कोरले आहेत त्यातील एक सामानगड! वल्लभगड, महिपालगड, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व फार आहे. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे.
सामानगडाचा इतिहास या ही आधीचा आहे. कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जातो. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला.
या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. सन २९ सप्टेंबर १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला.
सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व ८ मार्च १७०२ रोजी शहामीर यास किल्लेदार नेमले. यावेळी साबाजी क्षीरसागर गडाचे किल्लेदार होते.
सन जुलै-ऑगस्ट १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली.
या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.


गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) ज्यांना बेळगाववरुन यायचे असेल त्यांनी स्वताची गाडी असेल, तर संकेश्वरच्या आधी हलकर्णी या गावी जावे. तिथून बसरगेच्या रस्त्याला लागून नंदनवाड मार्गे नौकुडला जावे. गडाच्या दक्षिण उतारावर नौकुड वसलेले आहे. ईथून थेट डांबरी सडक गडमाथ्यावर घेऊन जाते.
२) गडहिंग्लज वरून नौकुडला जाण्यासाठी थेट एस.टी. आहेत.स्वताच्या गाडीने कोल्हापुर बाजुने यावयाचे असेल तर संकेश्वर – गडहिंग्लज-चिंचेवाडी- सामानगड असे थेट येता येईल. गड पाहून नेसरीचे स्मारक बघणे सोयीचे ठरेल.
गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.

डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे.
सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत. गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरुनच निशाण बुरुजाकडे जायचे. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो.
विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पूर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते.
मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत. अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते. या विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या असून, पायर्‍यावर सुंदर कमानी आहेत.


पायर्‍या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैदयांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत.
या वैशिष्ट्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे. कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडी कडील तटावर जायचे. या तटावरुन जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणांस दिसतात. त्याचे प्रयोजन अद्याप कळलेले नाही.
पुढे आपणांस चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो. सोंडया बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकात आहे.
गड पाहून झाल्यानंतर गडावरुन सरळ जाणार्‍या सडकेने १५ मिनिटात आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरुन काढलेली लेणी आहेत.


या लेण्याच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळया आहेत. येथून उतरणार्‍या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणांस भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे.

अग्निज्वालेप्रमाणे शत्रूवर तुटून पडणार्‍या सात शूर मराठ्यांची गाथा या वीर अशा गिरीदुर्गाने याची देही याची डोळा पहिली आहे. गड पाहून खाली उतरताना मनोमन त्यांना सलाम करावा आणि गडाच्या स्थापत्यशैलीला मनात साठवत माघारी फिरावे.

तर मित्रांनो ही होती वेडात मराठे वेळ दौडले सात, पण या सात वीरांची आणि तो प्रसंग पाहिलेल्या किल्ल्याच्या इतिहासाची ऐकावी अशी कहाणी!
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने