गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर

गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर


अनेक लोक आंघोळ करताना थंड पाण्याचा (Cold Water Bathing) वापर करतात, तर असे बरेच लोक आहेत ज्यांना बारा महिने गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. साधारणपणे, गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांसाठी थंड पाण्यानं आंघोळ करून दिवसाची सुरुवात करणं खूप कठीण असते. जर तुम्हीही त्यांच्यापैकी असाल तर, लवकरच गरम पाण्यानं आंघोळ करण्याची तुमची सवय बदला. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असं समोर आलंय की, जे लोक थंड पाण्यानं आंघोळ करतात, त्यांची प्रतिकारशक्ती गरम पाण्यानं आंघोळ करणाऱ्या (Hot Water Bathing Side effects) लोकांपेक्षा जास्त असते. अभ्यासात असंही सांगितलं गेलंय की, जे लोक थंड पाण्यानं आंघोळ करतात, ते तुलनेनं कमी आजारी असतात. थंड पाण्यात अंघोळ केल्यानं शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात, असं म्हणतात.

ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर विद्यापीठातील व्यायाम आणि आरोग्य मानसशास्त्रातील अभ्यासक लिंडे बॉटम हॅटफिल्ड म्हणतात की, नेदरलँडमध्ये केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, ज्या लोकांनी थंड पाण्यानं आंघोळ केली ते गरम पाण्यानं आंघोळ करणाऱ्या लोकांपेक्षा आजारी पडल्यानं कमी सुट्ट्या घेतात. हा अभ्यास तीन हजार लोकांवर करण्यात आला. प्रत्येकाला चार गटात विभागलं गेलं. एका गटाला दररोज गरम पाण्यानं आंघोळ करण्यास सांगण्यात आलं तर, दुसऱ्या गटाला 30 सेकंद थंड पाण्यानं आंघोळ करण्यास सांगण्यात आलं. तिसऱ्या गटाला 60 सेकंद आणि चौथ्या गटाला 90 सेकंद थंड पाण्यानं आंघोळ करण्यास सांगण्यात आलं. प्रत्येकाला एक महिना असं करण्यास सांगितलं गेलं.
अभ्यासात असं आढळून आलं की, ज्या गटानं थंड पाण्यानं आंघोळ केली, त्यांनी आजारपणामुळं कामावरून विश्रांती घेण्याचं प्रमाण 29 टक्क्यांनी कमी होतं. विशेष म्हणजे थंड पाण्यानं आंघोळ करताना घेतलेल्या वेळेत कोणताही फरक नव्हता. दरम्यान, थंड पाण्यानं आंघोळ करणारे लोक कमी आजारी का पडले, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु हे रोग प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं  असू शकतं असं काही संशोधकांचं मत आहे.
झेक प्रजासत्ताकातील एका अभ्यासानुसार, जेव्हा तरुण खेळाडूंना सहा आठवड्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा थंड पाण्यानं आंघोळ करण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती थोडी सुधारली. मात्र, या बाब पुराव्यानिशी सिद्ध होण्यासाठी अजून अभ्यास आवश्यक आहे.

थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं नॉरॅड्रेनालाईन हार्मोन वाढतो

थंड पाण्यानं आंघोळ करण्यासारख्या क्रियांमध्ये मज्जासंस्था सक्रिय होते, तेव्हा नॉरॅड्रेनालाईन हार्मोनमध्ये वाढ होते. जेव्हा लोक थंड पाण्याने आंघोळ करतात, तेव्हा हा हार्मोन हृदय गती आणि रक्तदाब वाढण्याचं सर्वात मोठं काम करतो. थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं रक्ताभिसरण सुधारत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. थंड पाण्याच्या अंघोळीमुळं त्वचेतील रक्ताभिसरणही सुधारतं. व्यायामानंतर थंड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर केलेल्या अभ्यासानुसार असं दिसून आलंय की, यामुळं चार आठवड्यांनंतर स्नायूंचं रक्ताभिसरण सुधारलं.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने