पिंगळा.. एक लोककला..

 पिंगळा.. एक लोककला..

फेसबुक लिंक http://bit.ly/34TfVIC

लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मनोरंजन आणि प्रबोधनासाठी या कलांचा जन्म झाला असला तरीही आजकाल शहरातही त्यातील काही कलाकार मंडळींचा वावर असतो. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात. परंतु कित्येक लोककला सध्याच्या एकांगी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थेकडून होत असलेल्या वंचनेमुळे तसेच अनिष्ट रूढी परंपरेत गुरफटल्या जाऊन अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकीच एक पांगुळ किंवा पिंगळा हि लोककला ! वासुदेव, वाघ्या, नंदीबैलवाला, बहुरुपी, भुत्या यांच्याच मालिकेतला हा पिंगळा. लोकसाहित्य, कला, संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा दिसतात.

शिवकाळात आणि पेशवेकाळात या पिंगळ्याने हेरगिरीची मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो. शत्रुच्या गटात काय चालले आहे याची बितंबातमी राजापर्यंत पोहचविण्याचे काम यांनी केले. त्यामुळे या कलेला राजाश्रय होता.

भविष्यात काय घडणार आहे याची चिंता, उत्कंठा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. अनंत काळापर्यंत ती चालत राहणार आहे. भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग, पद्धती या माणसाच्या भौतिक आणि मानसिक विकासाबरोबर बदलत गेल्या. पण पोपटवाल्या ज्योतिषाकडे जाणारा गरीब सामान्य माणूस आणि अॅस्ट्रो कन्सलटंटकडे जाणारा उच्चविद्याविभूषित माणूस यांच्या मानसिकतेत फरक तो काय?. मार्ग कुठले का असेना, मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना! भविष्यात काय वाढून ठेवलंय? पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. पिंगळ्याने वर्तविलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती व जुन्या पिढीमध्ये ती आजही तशीच आहे.

पिंगळा बोले महाद्वारी। बोली बोलतो देखा।।

शकुन सांगतो तुम्हा। हा एक ऐका॥*

डुग डुग ऐका डुग डुग ऐका॥ धृ॥

पिंगळा बैसोनी कळसावरी। तेथेनि गर्जतो नाना परी।

बोलबोलती अति कुसरी। सावध ऐका॥

असे एकनाथ महाराजांचे एक भारुड आहे. पिंगळा रुपकाच्या माध्यमातून समाजामध्ये भविष्यात होणा-या बदलाचे संकेत एकनाथ महाराजांनी दिले होते.

तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं कंबरभर उंचीचं खोपटं. चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरला पुरुष आपोआप जागा होतो. वर्षानुवर्षांची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, कपाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद... सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर किंवा हल्ली लेंगा नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला आठ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला, की त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात.) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. गळ्यात कवड्याची माळ, मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो, तर दुसर्‍या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि मग निघतो गावमागणीला.

डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे. सूर्याचा सारथी अरुण हा शरीराने पांगळा, त्याच्यापासून उत्पत्ती किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून हा पांगुळ अर्थात पिंगळा. अरुणोदयाच्या आधी एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो आणि ते खरं होतं. त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो. ते भविष्य म्हणून गणले जाते. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य आणि पैसे देतात. मग खाशा स्वारी खूष होऊन आशिर्वादपर काव्य रचते. लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात. एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो. रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल? त्यामुळे काहीतरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो. रामप्रहर संपला की हा पिंगळा निष्प्रभ होतो. तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.

“पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय...”

सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरूचीही लुडबूड आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदूळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात !. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशिणीचा चेहरा चिंताक्रांत दिसला, की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो-

“त्रासलेली दिसतेस गं माय
काल रातच्याला भांडण झालं गं माय
मनाला लावून घेऊ नकोस गं माय
सुखाचा संसार करशील गं माय...” त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळणार आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.

पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तूच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ, कुंभाराने मडकी, सुताराने शेतीची लाकडी अवजारं, चर्मकाराने चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्या बदल्यात शेतकर्‍याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, कि ज्यांचा शेतकर्‍याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतिव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्‍याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र उपेक्षितच राहिला, कारण तो कधी येऊन जातो हेच कुणाला कळत नाही. खरेतर परंपरेने एक प्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत होता. त्याच्याइतकी सूक्ष्म निरीक्षणशक्ती क्वचितच कुणाकडे असेल. मात्र, दुर्दैवाने भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हा समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झालेला नाही.

राज्य शासनाकडून सतत झालेली उपेक्षा आणि महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती!! वर्षानुवर्षं आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले त्याचाच परिणाम म्हणून की काय, दाते श्रीमंत झाले आणि हा भटका समाज मात्र कायम वंचितच राहिला. आता काळाच्या ओघात पुढची पिढी शिकल्यामुळे इतर व्यवसायाकडे कल आणि त्यातून मिळणारा पैसा जास्त असल्यामुळे ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातून शाश्वत पैसा आणि मान मरातब नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही. 

पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा कशी मोडीत काढायची म्हणून काहींना नाइलाजास्तव व्यवसाय रेटावा लागतोय. नाही तर देवाचा कोप होईल अशी भीती असते. लोकांचे भविष्य सांगता सांगता आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
- ओंकार गोखले.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने