आदिलशहाने केली दत्ताची भक्ती आणि मुलीला मिळाली दृष्टी, नृसिंहवाडीचा दत्तमहिमा

आदिलशहाने केली दत्ताची भक्ती आणि मुलीला मिळाली दृष्टी, नृसिंहवाडीचा दत्तमहिमा


देव, ईश्वर हे प्रत्येकाचे श्रद्धा स्थान आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट या असिम आणि अनंत शक्तीपाशी येऊन थांबतात. दुःख, आनंद, यश, अपयश, प्रार्थना, इच्छा, आकांक्षा, करुणा, मानवता, क्षमा, दातृत्व सगळ्यांचाच संबंध या शक्तीशी संबंधित असतो.

देव हा भक्तवत्सल आणि कनवाळू, मायाळू आहे. जो कोणी त्याच्या चरणाशी मस्तक ठेविल त्या प्रत्येकाची इच्छा देव पूर्ण करतोच करतो अगदी निरपेक्ष भावनेने, पण आपल्या मनातील भाव आणि श्रद्धा खरी हवी, वर्तन चांगले हवे.
भगवान श्री दत्तात्रेय यांनी ज्या भूमीत, ज्या ठिकाणी तप आणि कर्म करून एक वास्तू कायम स्वरुपी पावन केली ती म्हणजेच नरसोबाची वाडी.


पूर्व काळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्री दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिन्ही देवांचे अंश रूप सामावून घेत त्रिमुखी रुपात प्रचलित झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात असलेले नरसोबाची वाडी हे एक छोटे शहर आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्ताचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी वास्तव्य केले, तसेच दत्ताचा दुसरा अवतार श्री नृसिंहसरस्वती यांनी तब्बल बारा वर्षे वास्तव्य केले होते म्हणून या ठिकाणाला वाडी नरसिंह, वाडी नारासोबा, नरसोबा वाडी आणि शेवटी नरसोबाची वाडी अशी नावे पडली.


इ स. १३७८ मध्ये कारंजा येथे श्री नृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला. १३८८ मध्ये संन्यासाची दीक्षा घेऊन ते तीर्थाटनास गेले त्यानंतर त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि १४३४ मध्ये त्यांनी औदुंबराच्या  झाडाखाली मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण नेहमीच येथे वास करू असे आश्वासन भक्तांना देऊन गाणगापूरला प्रस्थान केले.


श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. कुंभी, कासारी, तुलसी,सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्रा नद्या म्हणजेच पंचगंगा. या पाच नद्यांचा संगम कृष्णेबरोबर होतो, ही नदी पुढे कर्नाटकात वाहत जाते.
श्री नृसिहसरस्वती यांच्या नंतर अनेक सिद्ध देवतांनी येथे वास्तव्य केले आहे. यामध्ये परम पावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपालस्वामी महाराज, श्री मौनी स्वामी महाराज आणि श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा समावेश होतो. नदितीरामुळे परिसरास लाभलेली सुंदरता, समृद्धता, वातावरणात भरलेला भक्तिभाव, कृष्णेचे विस्तीर्ण पात्र यामुळे या रम्य आणि जागृत तीर्थक्षेत्री दत्तभक्त यांची कायमस्वरूपी दिवस रात्र गर्दी असते.


नरसोबाची वाडी नदीकिनारी असल्यामुळे महापुरचे पाणी पादुकांना स्पर्श करते त्यामुळे मूर्ती दरवर्षी हलवली जाते. उत्सवात येथे पहाटे तीन पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जागर असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूप दीप आरती, दत्त गजरात होणारा पालखीचा सोहळा आणि देवाला झोपण्याच्या कल्पनेने केलेली आरती म्हणजेच शेजारती असा नित्यक्रम असतो.
येथे बारा महिने भाविकांची गर्दी असते, त्यामुळे भाविकांसाठी भक्तनिवास, धर्मशाळा,भक्त वात्सल्य तसेच प्रसादालय यांची सोय असते.
भाविकांची प्रचंड श्रद्धा असलेले हे जागृत तीर्थक्षेत्र आहे. येथे येणारा कोणताही भाविक खाली हाताने जातच नाही. लोकांना याचे खूप सुंदर अनुभव आले आहेत. श्री दत्ताच्या नामस्मरणाने सारे आजार, विकार नाहीसे होतात. मन शांत होते. चांगल्या मनाने वागणाऱ्या भक्तांवर श्री दत्त महाराजांचा कायम कृपा आशीर्वाद नेहमीच असतो.

येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री दत्त महाराज संकटमुक्त करतात, त्यांचा असलेला त्रास दूर करतात, रोग्यांना आरोग्य देतात, थोडक्यात काय तर ज्याला जे हवे आहे ते ते दत्त महाराज मिळवून देतात. आपल्या भक्तांना सुखी ठेवण्यासाठी श्री दत्त महाराज कायम जागत असतात.


श्री दत्त महाराजांची सेवा करणाऱ्या लोकांना अर्चक असे म्हटले जाते. श्री दत्त महाराज संन्यासी असल्यामुळे पालखी जेव्हा निघते, त्या वेळी फक्त पूजा करणाऱ्या भाविकांना म्हणजेच अर्चकाना प्रवेश असतो. तसेच पालखीच्या वेळी अर्चक सोडून बाकी कोणीही पालखीला स्पर्श करायचा नाही असा तिथला नियम आहे.
या नरसोबाच्या मंदिराला कळस नाही. त्याचे एक खास कारण आहे. विजापूरचा राजा आदिलशहा यांच्या मुलीला दृष्टीदोष होता, ती बघू शकत नव्हती. त्या वेळी श्री दत्त महाराजांच्या कृपेची आणि जागृत असण्याची ख्याती आदिलशहाच्या कानावर गेली.
आदिलशहा हे मुस्लिम धर्माचे असूनदेखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते.आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री आले आणि निस्सीम भक्ती करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलीची दृष्टी परत येण्यासाठी प्रार्थना केली, त्यांच्या प्रार्थनेला फळ मिळाले.


श्री दत्तात्रेय यांनी त्यांच्या मुलीची दृष्टी परत दिली त्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही. कोणताही धर्म, जात,पंथ खऱ्या श्रद्धेच्या आड येत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे.
दत्तजयंती, श्री गुरु द्वादशी, नृसिंह जयंती, गुरुप्रतिपदा, गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव, दक्षिण द्वार सोहळा असे बरेच उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. पौर्णिमेपासून ते पंचमी पर्यंत लांबून लांबून लोक दर्शनासाठी येथे गर्दी करतात.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने