डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्विकारला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का
 स्विकारला ?



दलितांना दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्याय यांपासून मुक्ती लाभावी आणि आत्मसन्मानाने जगता यावं, यासाठी स्वातंत्रपूर्व काळापासून चळवळ उभारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर इथल्या दीक्षाभूमी मैदानावर विधिवत बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
या ऐतिहासिक घटनेच्या सुमारे चार महिने आधी म्हणजे २४ मे, १९५६ रोजी मुंबईच्या नरे पार्कवरील बुद्धजयंतीच्या समारंभातच त्यांनी ‘ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत’, अशी घोषणा केलेली होती.
त्या दृष्टीने दरम्यानच्या काळात सर्व नियोजन करून २३ सप्टेंबर, १९५६ रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून नागपूर येथे १४ ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याचं घोषित केलेलं होतं.
‘नागपूर ही बौद्धधर्मीय नागलोक यांची प्राचीनकालची पूण्यभूमी आहे’ आणि ‘बौद्धधर्माचं चक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी तेच ठिकाण योग्य राहील’, या धारणेपोटी त्यांनी या धर्मांतराच्या सोहळ्यासाठी नागपूर हे ठिकाण जाणीवपूर्वक निवडलं होतं.
धर्मातरापूर्वी म्हणजे, १९५६ च्या मे महिन्यात बीबीसी’वरून केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो याबद्दल पुरेशा स्पष्टतेने आपले विचार मांडले.
“मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वं सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्तवं शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला त्यांची आवश्यकता आहे.’
या सोहळ्याच्या आधीच्या दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबर, १९५६ रोजीही वृत्तपत्र-प्रतिनिधींना बोलावून बौद्ध धर्म स्वीकारामागील आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्ही आपलं मनुष्यपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.
डॉ. आंबेडकर एकदा अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी गांधीजींशी चर्चा करत असताना त्यांना म्हणाले की, ‘अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले, तरी वेळ येईल तेव्हा मी या देशाला कमीत कमी धोका होईल, असा मार्ग स्वीकारेन. बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचं जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, अशी मी खबरदारी घेतली आहे.’
एकंदरीत, १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा अत्यंत विचारपूर्वकच स्वीकार केला. त्या दिवशी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुसीनारा येथील महास्थविर चंद्रमणी या वयोवृद्ध भिक्षूंकडून आंबेडकर यांनी विधिवत दीक्षा घेतली.
बौद्ध धर्मस्वीकाराच्या सोहळ्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर साचीच्या स्तूपाचा आकार देऊन शुभ्र वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं होतं. त्यापुढे दोन भव्य मंडप उभारलेले होते.
बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई आणि सहाध्यायी रट्टू व इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले. तेव्हा त्यांनी नवीन पांढरं रेशमी धोतर, पांढरा सदरा आणि वर पांढरा लांब कोट असा पेहराव केला होता. सविताबाईंनीही पांढरं शुभ्र लुगडं परिधान केलं होतं. सुमारे तीन लाखांच्या जनसागराने त्यांचं उत्साहाने स्वागत केलं.
शपथविधीसाठी बाबासाहेबांनी स्वतः सगळा मजकूर तयार केलेला. सकाळी ९ वाजता सुरू असलेला हा सोहळा पाऊण तासात संपला.
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धर्मांतरानंतर समारंभात उपस्थित असलेल्या सुमारे तीन लाख अनुयायांना आवाहन केलं की, ‘ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी उभं राहावं.’ यानंतर सगळ्यांनी उभा राहून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
धर्मांतराची ही घटना एकाएकी घडली नाही. बऱ्याच विचारानंतर डॉ, आंबेडकरांनी हा निर्णय घेतला होता. डॉ. आंबेडकरांचं सार्वजनिक कार्य १९१९ -२० पासूनच सुरू झालं होतं. १९२७ च्या महाडच्या सत्याग्रहापासून दलितांचे महत्त्वाचे नेते म्हणून ते पुढे आले.
बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पर्यायाचा गंभीरपणे विचार केला. आपल्या अनुयायांना हा निर्णय पटवून देणं सोपं नाही, याची जाणीव बाबासाहेबांना होती. येवला परिषदेनंतर ठिकाणी जाहीर सभा मेळावे भरवून त्यांनी या प्रश्नावर त्यांनी जागृती घडवून आणली.
अनेक शतकांपासून सुरु असलेला अन्याय झुगारून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली,
” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .”
धर्मांतरीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मातर का करायचं आणि कोणता धर्म स्वीकारायचा, हे प्रश्न डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. तसं पाहायला गेले तर मुस्लिम, ख्रिश्चन व इतर अनेक धर्माचा त्यांच्या पुढे पर्याय होता. तसे प्रस्ताव पण आले होते. पण बाबासाहेबांना एका मार्गदर्शनपर तत्त्वज्ञानाचा आधार देणाऱ्या धर्माची गरज भासली. त्या दृष्टीने विवेकबुद्धी आणि समानतेच्या मूल्यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म त्यांना जवळचा वाटला.
१९५० नंतर त्यांची अंतिम निर्णयाकडे झपाट्याने वाटचाल झाली. राजकीय फायद्या-तोटयाच्या हिशेबापेक्षा व्यक्तीला उन्नत जीवनाचा अनुभव देणं आणि समानतेवर आधारित समाजनिर्मितीचा मार्ग खुला करणं, हे त्यांनी महत्त्वाचं मानलं.
धर्मांतरानंतर एका मोठ्या, अन्यायग्रस्त समाजाला आत्मविश्वास प्राप्त झाला. ठिकठिकाणच्या बौद्धविहारांद्वारे जागृती आणि संघटनांच्या कार्याला चालना मिळाली. या सगळ्या बाबी धर्मांतराने घडवून आणलेल्या बदलांच्या साक्षीदार आहेत.
तसंच धर्मांतराच्या घटनेमुळे जातिसंस्थेच्या तात्त्विक  चिकित्सेला धार आली. केवळ सुधारणावादी दृष्टीच्या पलीकडे जाऊन सामाजिक क्रांतीला चालना देण्याचं काम धर्मातराच्या घटनेने केलं.
धर्मांतराचा निर्णय घेतल्यापासून प्रत्यक्ष बौद्ध धर्माचा स्वीकार करेपर्यंतच्या काळात आंबेडकरांना विविध प्रकारच्या टीकाकारांना सामोरं जावं लागलं.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने